कल खेल मे हम हो ना हो : मुकेश स्पेशल ( व्हिडीओ)

mukesh singer

महान गायक मुकेश यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा रंगकर्मी योगेश शुक्ल यांचा लेख. सोबत मुकेश यांची गाजलेली निवडक गाणी सादर करत आहोत.

आपल्या गोड पण तितक्याच दर्दभर्‍या आवाजाने रसिकांच्या मनाला भुरळ पाडणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गायक मुकेश यांचा आज स्मृतिदिन. २२ जुलै १९२३ साली जन्मलेले मुकेश यांचे खरं नाव मुकेशचंद माथुर. पण त्यांच्या घराण्याने माथुर हे आडनाव टाकून त्याचं नाव हेच आडनाव म्हणून धारण केलं. मुकेश यांना लहानपणापसुनच गाणी आणी अभिनयाची आवड होती. के. एल. सैगल हे त्यांचे आदर्श होते. मोतीलाल या त्या काळच्या प्रख्यात अभिनेत्याने मुकेश यांना त्यांच्या बहिणीच्या लग्नात गाताना ऐकले. त्यांनीच मुकेश यांना मुंबईला येण्यास सांगितले. मुकेश यांना सुरुवातीच्या त्या काळात मोतीलाल यांची खुप मदत झाली. १९४१ साली त्यांनी निर्दोष या चित्रपटाद्वारे अभिनेता-गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. पण खरया अर्थाने त्यांनी पार्श्‍वगायनाला सुरुवात केली ती १९४५ ला पहली नजर या चित्रपटातील दिल जलता है.. ह्या गाण्यापासून ! हे लोकांना खुप आवडल आणी मुकेश रातोरात स्टार झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही.

मुकेश यांनी आपल्या तीन दशकाच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटात पार्श्‍वगायन केले.त्यांना चार वेळा फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ पार्श्‍वगायक हा पुरस्कार मिळाला.निर्माता म्हणूनही त्यांनी मल्हार, आक्रमण या सिनेमांची निर्मिती केली. त्यांच्या आयुष्यातील एक टर्नींग पॉइंट म्हणजे त्यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट. कारण पुढे या द्वयीने आवारा, बरसात, श्री ४२०, अनाड़ी, जिस देश में गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर यांसारख्या सिनेमाद्वारे काय इतिहास रचला ते आपल्या सगळ्याना माहिती आहेच. राज कपूर यांच्या यशात काही वाटा मुकेश यांच्या गाण्याचाहि होता हे कोणीही अमान्य करणार नाही. त्यांनी दुख-सुख, आदाब अर्ज, माशूका, आह, आक्रमण व दुल्हन यांसारख्या सिनेमातून अभिनेता म्हणून कामही केले. पण ते या अभिनेता म्हणून काही विशेष चमक दाखवू शकले नाही. त्यानी अभिनायासाठी काही काळ गायन ही बाजूला ठेवले होते पण योग्य वेळीच ते सावरले आणि पुन्हा गायनावर लक्ष केन्द्रित केले. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीगंधा मधील गाणे कई बार यू ही देखा है साठी मुकेश यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला. मुकेश यांचे २७ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले. पण मागे राहिला त्यांचा अजरामर आवाज.

कल खेलमे हम हो ना हो
गर्दिशमे तारे रहेंगे सदा
भूलोगे तुम भूलेंगे वो
पर हम तुम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यही अपने निशान…

योगेश शुक्ल
मोबाईल क्र.:-९६५७७०१७९२

( प्रस्तुत लेखक ख्यातप्राप्त रंगकर्मी असून विविध विषयांवर सोशल मीडियातून लिखाण करतात.)

मुकेश यांची गाजलेली गाणी

मुकेश यांनी आपल्या तीन दशकांपेक्षा जास्त प्रदीर्घ कालखंडात जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. यातील त्यांचे दर्दभरे गाणे विशेष लोकप्रिय झाले असले तरी त्यांचा विविध मूडसमधील आवाजही रसिकांच्या पसंतीस पडला. येथे आपल्यासाठी त्यांची गाजलेली गाणी सादर करत आहोत.

१) आवारा हू….: राज कपूर यांच्या आवारात या चित्रपटातील हे टायटल साँग तुफान गाजले. भारतच नव्हे तर रशिया व चीनसह अनेक देशांमधील रसिकांनी याला डोक्यावर घेतले. आजही जगातील अनेक देशांमध्ये हे गाणे लोकप्रिय आहे.

२) मै पल दो पल का शायर हू : कभी कभी या चित्रपटातील सगळीच गाणी उत्तम असली तरी या गाण्याची बात काही औरच ! साहिर याचा कलाम, खय्यामजींचे संगीत, अमिताभचा अभिनय आणि मुकेश यांचा आवाज. सगळे काही मस्त जुळून आलेले आहे.

३) इक दिन बिक जायेगा : धरम करम या चित्रपटातील हे गीत जीवनातील एक शाश्‍वत सत्य आपल्या अगदी सहजपणे सांगते. मातीमोल जीवनात आपले कर्म हेच बाकी राहतील असे यात अतिशय मधुरपणे नमूद करण्यात आलेले आहे.

४) जीना यहा मरना यहा : मेरा नाम जोकर या चित्रपटातील हे गाणे म्हणजे मास्टरपीस आहे. उच्च तात्वीक पातळीवरील हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे.

५) ये मेरा दिवानपन है : यहूदी चित्रपटातील या गीताने एक काळ गाजविला आहे. मुकेश हे राज कपूर यांचा आवाज म्हणून ओळखले जात असतांना दिलीप कुमारा यांनादेखील त्यांचा आवाज फिट बसत असल्याचे या गीताने दाखवून दिले.

६) सब कुछ सीखा हमने ना सिखी होशियारी : अनाडी चित्रपटातील हे गाणे साध्या माणसाच्या आयुष्यातील वैफल्य अतिशय भेदक पध्दतीत वर्णन करते.

७) कही दूर जब दिन ढल जाये : आनंद चित्रपटात तेव्हाचा सुपरस्टार असणार्‍या राजेश खन्ना यांना मुकेश यांनी दिलेला या गाण्यातील आवाज रसिकांना चांगलाच भावला आहे. हे गाणे आपल्याला हुरहूर लावल्यावाचून राहत नाही.

८) सजन रे झूठ मत बोलो : तीसरी कसम या चित्रपटातील हे गाणे उच्च तात्वीक विचार मांडणारे आहे. शैलेंद्र यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आपटला असला तरी यातील गीत-संगीत रसिकांना चांगलेच भावले.

९) किसी की मुस्कराहटो पे हो निसार : अनाडी चित्रपटातील हे गाणे अतिशय लोभस असे आहे. जीवनातील खरा आनंद हा इतरांना मदत करण्यात असल्याचे यात दर्शविण्यात आले आहे.

१०) दिवानो से ये मत पूछो : सत्तरच्या दशकात मनोज कुमार यांच्यासाठी मुकेश यांनी अनेक गीते गायली. यातील शोकात्म बाज असणारे हे गीतदेखील खूप लोकप्रिय झाले होते.

११) चांद सी मेहबूबा हो मेरी : हिमालय की गोद मे या चित्रपटातील या गीतामध्ये प्रेमाचा अजून एक नवीन पैलू दर्शविण्यात आलेला आहे.

१२) सुहाना सफर और ये मौसम हसी : मधुमती चित्रपटातील मुकेश यांचे हे गीत ऑल टाईम क्लासीक्स मध्ये गणले जाते. यातील कोरस तर लाजवाब !

१३) जाने कहा गये वो दिन : मेरा नाम जोकर चित्रपटातील हे गाणे काळाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आठवणींना स्मरण करून देते.

१४) चंदन सा बदन चंचल चितवन : सरस्वतीचंद्र चित्रपटातील या गाण्यामध्ये आपल्या प्रेयसीची स्तुती करणार्‍या प्रियकराची भारावलेली अवस्था दर्शविलेली आहे.

१५ ) ये दुनिया इक नंबरी तो मै दस नंबरी : मुकेश फक्त शोकात्म गाणे समरसून गात असत अशी टीका करणार्‍यांना चोख उत्तर देणारे हे गाणे आहे. यातील नायकाचा अवखळपणा आणि आत्मविश्‍वास आपल्या गायनामधून मांडण्याचे काम मुकेश यांनी केले आहे.

Protected Content