ऑस्करच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीवर उज्वल निरगुडकर यांची निवड

मुंबई : वृत्तसंस्था । ऑस्कर अकादमीच्या (अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅँड सायन्सेस) विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या सदस्यांमध्ये उज्वल निरगुडकर यांची निवड झाली आहे.

‘ऑस्कर’ला असलेली प्रतिष्ठा, त्याला जगभर मिळणारा मानसन्मान याबद्दल नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ऑस्करचा एक भाग होणं हीदेखील तेवढीच मानाची गोष्ट. ऑस्कर अकादमीचे सदस्य आणि सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्सचे अध्यक्ष उज्वल निरगुडकर यांना हा मान मिळाला आहे.

ऑस्कर अकादमी त्याच्या संपूर्ण नावातील ‘आर्ट्स’प्रमाणे ‘विज्ञान’ विभागासाठीदेखील तितकीच कार्यक्षम असते. कलाकार, चित्रपट यांच्या पुरस्कारांप्रमाणे त्यासंबंधी असलेलं विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठीही पुरस्कार दिले जातात. त्याची निवड करण्याचं काम विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीकडे असतं. या समितीत २१ सदस्य असतात. यामध्ये दरवर्षी काही नवीन सदस्य घेतले जातात.

‘ऑस्करसारख्या मानांकीत अकादमीच्या समितीवर सदस्य म्हणून नेमणूक होणं ही अभिमानाची बाब आहे. देशाचं प्रतिनिधीत्व करत सिनेसृष्टीसाठी काहीतरी करण्याची ही संधीच आहे. भारतीय मनोरंजनविश्वातील तांत्रिक समस्यांबाबत समितीमध्ये चर्चा होऊ शकते.तंत्रज्ञानाचा भारतीय चित्रपटांसाठी फायदाही होऊ शकतो. आपल्याकडचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम होतील यासाठी काम करता येईल’, असं निरगुडकर यांनी सांगितलं.

विज्ञान आणि तंत्रज्ञान समिती २००३ मध्ये स्थापन झाली. १७ वर्षांत समितीमध्ये उज्वल हे भारतीय नागरीकत्व असलेले पहिले भारतीय आहेत. यापूर्वी त्या समितीवर अमेरिकन नागरिकत्व असलेल्या भारतीयांची नेमणूक झालेली आहे.

नवनवीन प्रकल्पांवर संशोधन करण्यासाठी समिती सदस्यांचे सल्ले घेणं, नामांकित कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्या मुलाखती घेऊन ते ‘हिस्ट्री ऑफ सिनेमा’च्या अंतर्गत जतन करणं आणि शिक्षण देऊन नवनवीन विद्यार्थ्यांना तयार करणं ही या समितीची मुख्य कामं असतात. ‘कोरोनाच्या आव्हानात्मक काळात जागतिक चित्रपट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्न सोडवता येतील. समितीमध्ये अनुभवी सदस्यांबरोबर काम करत आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची ही संधी आहे’, असं त्यांनी सांगितलं. उज्वल हे भारतीय सिनेविश्वात तांत्रिक विभागासाठी गेली ३८ वर्षं काम करत आहेत.

Protected Content