
भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भगवान झूलेलालांविषयी छत्तीसगड येथील जोहार पार्टीचे प्रमुख अमित बघेल यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध करत भुसावळ शहरातील सिंधी समाज बांधवांनी मंगळवारी दुपारी चार वाजता प्रांत कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन केले. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी अमित बघेल यांच्या छायाचित्राला काळा फासून निषेध केला. त्यानंतर त्यांच्या पोस्टरवर जोडे मारून संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. ‘भगवान झूलेलालांचा अपमान सहन केला जाणार नाही’, ‘अमित बघेल माफी मागा’, ‘धार्मिक भावना दुखावणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन अमित बघेल यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांनी म्हटले की, देशभरातील सिंधी समाज भगवान झूलेलालांना आपला आराध्य देव मानतो आणि त्यांच्या विरोधात केलेले वक्तव्य संपूर्ण समाजाचा अपमान आहे. अशा प्रकारचे वक्तव्य सामाजिक सलोखा बिघडवणारे असून त्यावर उदाहरणार्थ कारवाई होणे आवश्यक आहे.
या आंदोलनात सिंधी समाजातील ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, महिला, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असले तरी आंदोलन शांततेत पार पडले.
धार्मिक भावनांचा अपमान करणाऱ्यांविरोधात समाजाची भूमिका ठाम असल्याचे या आंदोलनातून दिसून आले असून प्रशासनाकडून योग्य कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



