मुक्ताबाई तीर्थक्षेत्री तुळशी विवाह आणि रूख्मिणी स्वयंवर उत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ, मुळमंदिर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रूख्मिणी स्वयंवर पारायण व तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्याला असंख्य भाविक व वारकरी मंडळी उपस्थित राहून संत परंपरेतील या भक्तिमय उत्सवाचा लाभ घेतला.

कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीनंतर तुळशी विवाहाची परंपरा सुरू होते. याच परंपरेचा भाग म्हणून श्रीसंत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ, जुने मंदिर कोथळी येथे या दिवशी श्रीसंत एकनाथ महाराज लिखित “रूख्मिणी स्वयंवर” या ग्रंथाचे पारायण भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दुपारी १ ते ४ या वेळेत पारायण सोहळा पार पडला, ज्यामध्ये उपवर मुला-मुलींनीही उत्साहाने सहभाग घेतला.

या पारायणाचे वाचन आणि नेतृत्व ह.भ.प. दुर्गाताई संतोष मराठे यांनी केले. पारायणानंतर शुभ मुहूर्तावर तुळशी विवाह सोहळा पार पडला. या पवित्र सोहळ्यानंतर भाविकांनी यथेच्छ महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी परिसर भक्तिगीतांनी आणि “जय मुक्ताई” च्या घोषांनी दुमदुमून गेला.

या प्रसंगी श्रीसंत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, विश्वस्त संदीप पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, संत मुक्ताई सोहळा प्रमुख व कार्यक्रमाचे यजमान ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे, रामेश्वर तिजारे महाराज, भावराव महाराज, रतीराम महाराज खामखेडा, कृष्णा महाराज तायडे, अमोल महाराज कासलीकर, चेतन महाराज, अंबादास महाराज, वैष्णवी महाराज वडगाव, वैष्णवी महाराज रावेर, उमेश राणे यांच्यासह असंख्य भाविक, वारकरी व भक्त उपस्थित होते.

या सोहळ्याने भक्तिमयतेचे आणि संत परंपरेच्या अखंड प्रवाहाचे दर्शन घडवले. श्रद्धा, भक्ति आणि परंपरेचा संगम असलेल्या या उत्सवाने मुक्ताईनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.