यावल शहरात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी : राजकीय शुभेच्छा फलक हटवले 


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्यात आगामी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, यावल शहरात तिची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय मंडळींचे शुभेच्छा बॅनर, फलक आणि जाहिराती हटविण्याची मोहीम नगर परिषद प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर राज्यभर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यावल शहरातही यानुसार तातडीने कारवाई सुरू करण्यात आली. नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी रविकांत डांगे यांच्या आदेशानुसार शहरातील प्रमुख चौक, रस्ते, भिंती आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले शुभेच्छा देणारे बॅनर आणि फलक हटविण्याचे काम नगर परिषद कर्मचाऱ्यांनी हाती घेतले आहे.

शहरातील सुभाष चौक, गांधी चौक, बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ आणि अन्य गर्दीच्या भागांतील फलक हटविण्यात आले आहेत. यामुळे प्रशासनाचा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिस्तबद्धतेने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

नगर परिषद प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांना नियमांचे पालन करण्याचे आणि अनधिकृत जाहिराती, पोस्टर्स, बॅनर टाळण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनीही निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायद्याचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.