मुरलीधर चौधरी यांची भाजपा तीर्थक्षेत्र आघाडी जिल्हा सहसचिवपदी नियुक्ती 


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कळमसरे (ता. अमळनेर) येथील समाजसेवक, माजी माळी समाज अध्यक्ष व ह.भ.प. मुरलीधर तुळशीराम चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे परिसरात स्वागत होत असून वारकरी संप्रदायासह ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ह.भ.प. मुरलीधर चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. माळी समाजाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजातील युवकांमध्ये एकतेचा संदेश दिला आहे. तसेच केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांतही सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना जिल्हा सहसचिवपदी नेमणूक करून सन्मानित केले आहे.

ही निवड भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, तसेच भाजपा कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातील अनुयायी आणि कळमसरे व परिसरातील ग्रामस्थांनी मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

या नियुक्तीमुळे कळमसरे परिसरातील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या धार्मिक व तीर्थक्षेत्र विकास उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.