
अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक संवेदनशील निर्णय घेतला आहे. त्यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करता त्या वाढदिवसाच्या खर्चातून आपत्तीग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.
दरवर्षी सभापती अशोक पाटील यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी, आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि अशोक भाऊ मित्रमंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे हा दिवस उत्साहात पार पडतो. मात्र, यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जल्लोष टाळण्याचा आणि मदतीचा मार्ग निवडला आहे.
अशोक पाटील यांच्या पत्नी आणि आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. योगिता अशोक पाटील या मुडी-मांडळ जिल्हा परिषद गटातील उमेदवारी इच्छुक असून, त्या भागातील वासरे, खेडी, खर्दे या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, मका आणि इतर पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेऊन सभापती पाटील यांनी आपला वाढदिवसाचा संपूर्ण खर्च या गावांतील गरजवंत शेतकऱ्यांना मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशोक पाटील यांनी आपल्या मित्रपरिवार, हितचिंतक आणि सहकाऱ्यांना आवाहन केले आहे की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू किंवा जल्लोष करण्याऐवजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत करावी. “माझा वाढदिवस शेतकरी पुत्राला शोभणारा ठरेल, जेव्हा माझ्या आनंदाचा उपयोग संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी होईल,” असे त्यांनी सांगितले.
सभापती पाटील यांचा हा निर्णय केवळ सामाजिक संवेदनशीलतेचा नमुना नसून, समाजातील जनप्रतिनिधींनी दाखवावा असा आदर्श मानला जात आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



