अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था | शासकीय कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळते. याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टासमोर आलेल्या एका गुंतागुंतीच्या खटल्यात कोर्टाने अतिशय महत्वाचा असा निकाल दिलेला आहे.

सरकारी कर्मचार्‍याच्या मृत्यूपश्चात वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येते. यामध्ये मृत कर्मचार्‍याचे अपत्य किंवा पत्नी यांचा विचार केलेला आहे. मात्र, संबंधीत मयत कर्मचार्‍यच्या पत्नीची म्हणजेच मुलांच्या आईची इच्छा नसेल तर मुलगा किंवा मुलगी ही नोकरी करू शकत नाही, असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मध्यप्रदेशातील एका खटल्यात सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे. प्रकरण असे होते की, विधवा पत्नीने आपल्या मुलाला पोलीस विभागात सब इन्स्पेक्टरची नोकरी द्यावी असा अर्ज केला होता. मात्र, पोलीस दलाने तो अनफिट असल्याचे दाखवत नोकरी देण्यास २०१५ मध्ये नकार दिला होता. यानंतर मुलीने अर्ज केला होता. मात्र, त्यांच्यात वाद आहे. मुलीने वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळावा यासाठी केस दाखल केलेली आहे. ही केस अद्याप न्यायालयात सुरु आहे.

या कारणाने कर्मचार्‍याच्या पत्नीने मुलीला नोकरी न मिळण्यासाठी पोलीस दलाला कळविले. यामुळे पोलीस विभागाने आईची परवानगी नसल्याने मुलीचा नोकरीचा अर्ज रद्द केला. यानंतर हे प्रकरण मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात गेले होते. तिथे न्यायालयाने पोलीस दलाच्या बाजुने निकाल दिला. याविरोधात ही मुलगी सर्वोच्च न्यायालयात गेली होती. तिथेही तिच्याविरोधात निकाल गेला आहे. यासाठी मध्य प्रदेशच्या नियमांचा आधार घेण्यात आला आहे. याचाच अर्थ विधवा पत्नीची संमती नसेल तर सरकारी कर्मचार्‍याच्या निधनानंतर अपत्याला नोकरी मिळू शकत नाही. यासाठी त्या कर्माच्यार्‍याच्या पत्नीची संमती असणे आवश्यक आहे. यामुळे हा निकाल अतिशय महत्वाचा मानला जात आहे.

 

 

Protected Content