राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

Uddhav Thackeray

मुंबई, वृत्तसंस्था | कणकवलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि त्यांचे पुत्र व भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडल्यानंतर लगेचच शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि सावंतवाडी अशा दोन ठिकाणी सभा घेणार असून या सभांमध्ये राणे यांच्या भाजप प्रवेशावर ते कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

राज्यपातळीवर शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी किमान ५० मतदारसंघांत दोन्ही पक्षातील इच्छूकांनी बंडाचे निशाण फडकावत युतीच्या अधिकृत उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे. त्यात सिंधुदुर्गातील बंडखोरीला शिवसेना विरुद्ध नारायण राणे या जुन्या वादाची किनार आहे. त्यामुळेच या जिल्ह्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

कणकवली मतदारसंघात शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांना उमेदवारी दिली. त्याला आव्हान देत शिवसेनेने युतीधर्म जिल्ह्याबाहेर ठेवत नितेश यांच्याविरुद्ध सतीश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर हे युतीचे अधिकृत उमेदवार असून त्यांच्याविरुद्ध भाजपच्या राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पाहायला मिळत असताना आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेने या संघर्षाच्या पुढील अंकाची नांदी झाल्याचे बोलले जात आहे.

राणे यांचा लांबणीवर पडलेला भाजप प्रवेश आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कणकवलीतील सभेत झाला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले मात्र शिवसेनेची बंडखोरी वा शिवसेना नेतृत्वावर त्यांनी अवाक्षरही काढले नाही. ‘अनेक लोक आपल्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. पण, त्याकडं दुर्लक्ष करा. प्रेमानं आणि शांततेनं लढा. जिंकणाऱ्या लोकांनी वाघासारखं राहायचं असतं’, असं मोघम वक्तव्य त्यांनी कुणाचाही उल्लेख न करता केलं. त्यावर आता उद्धव ठाकरे कोणता पवित्रा घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी कणकवलीत सभा घेतल्यास तिथे उद्धव ठाकरेसुद्धा सभा घेतील, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आधीच सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची सभा संपताच शिवसेनेने लगेचच उद्धव यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची घोषणा केली. उद्धव उद्या (१६ ऑक्टोबर) सिंधुदुर्गात जात आहेत. त्यांची पहिली सभा सायंकाळी ४.०० वाजता कणकवलीत होणार आहे तर दुसरी सभा सायंकाळी ७.०० वाजता सावंतवाडीत होणार आहे. कणकवलीत भाजपविरुद्ध शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असल्याने व दसरा मेळाव्यात नितेश राणे यांचा पराभव करण्याची गर्जना शिवसेना नेत्यांनी जाहीरपणे केल्याने उद्धव यांच्या टीकेचे लक्ष्य राणे आणि फॅमिलीच असेल, असे संकेत मिळत आहेत.

Protected Content