श्रीराम चिट्स घोटाळा : मॅनेजरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विमा पॉलिसीसाठी दिलेली वैयक्तिक कागदपत्रे परस्पर दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरून फसवणूक केल्याच्या प्रकरणात श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीचा व्यवस्थापक विवेक बिरे (रा. जळगाव) याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

यावल येथील वैद्यकीय व्यवसायिक प्रशांत कासार यांनी श्रीराम लाइफ इन्शुरन्सचे एजंट मुकेश पाटील यांच्याकडे पॉलिसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे – आधार, पॅन कार्ड, आयटी रिटर्न इत्यादी सादर केली होती. मात्र, ही कागदपत्रे परस्पर मोमीन शेख तौसिफ शेख कामील या व्यक्तीच्या जामीन अर्जासाठी वापरण्यात आली. प्रशांत कासार यांना नोटीस आल्यावर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकारात चौकशीनंतर रामानंदनगर पोलिस ठाण्यात विवेक बिरे व एजंट मुकेश पाटील यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. व्यवस्थापक विवेक बिरे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी तपासातील पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद सादर केला. त्यांनी हे संपूर्ण प्रकरण चिट्स फंडच्या नावाखाली केलेला अपहार असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेत, बिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तक्रारदारातर्फे ॲड. मिलिंद पाटील व ॲड. अजय कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Protected Content