पाचोर्‍यात श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव उत्साहात ; १९० वर्षांची परंपरा  


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा नगरीत वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पारंपरिक उत्साह, भक्तिभाव आणि ढोलताशांच्या गजरात श्री बालाजी महाराजांचा ऐतिहासिक रथोत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा करण्यात आला. तब्बल १९० वर्षांची परंपरा लाभलेला हा रथोत्सव संपूर्ण शहर आणि पंचक्रोशीतील भाविकांसाठी श्रद्धेचा मोठा सोहळा ठरला.

४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता रथगल्ली येथून श्री बालाजी महाराजांच्या रथयात्रेला प्रारंभ झाला. भगवानाची मूर्ती रथात विराजमान करून “श्री बालाजी महाराज की जय” या जयघोषात भाविकांनी रथ ओढत मिरवणुकीला प्रारंभ केला. ही मिरवणूक रथगल्ली, विठ्ठल मंदिर रोड, तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड मार्गे पुन्हा रथगल्ली येथे पोहोचली. रात्री नऊ वाजता या रथोत्सवाची सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी दर्शन घेत या पारंपरिक सोहळ्याचा आनंद लुटला.

शहरात गांधी चौक, शिवाजी चौक आणि जामनेर रोड परिसरात यात्रेचे स्वरूप लाभले होते. भाविकांनी रथाच्या मार्गावर आरत्या ओवाळून, पूजा अर्चा करून व केळी-नारळ अर्पण करत श्रद्धेचे दर्शन घडवले. रथावर कळस, लाकडी घोडे, अर्जुनाची मूर्ती, चोपदार आणि राक्षसांच्या मूर्तींसह पारंपरिक कलाकृती सजविल्या होत्या. भगवे ध्वज, झेंडूच्या माळा, केळीचे खांब आणि विजेच्या रोषणाईने रथ अतिशय आकर्षक दिसत होता.

रथयात्रेपूर्वी आदल्या दिवशी रात्री श्री बालाजी महाराजांची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. सयाजी पाटील परिवाराचा हा रथ असून, संपूर्ण देखभाल व व्यवस्था त्यांच्याच वतीने केली जाते. रथाच्या पूजेचा मान दरवर्षी पाटील परिवारातील नवविवाहित जोडप्यास दिला जातो. यंदा धार्मिक विधी आणि दैनंदिन पूजेचा मान प्रमोद जोशी यांचेकडे होता.

रथ थांबविणे आणि वळविण्यासाठी लाकडी मोगरीचा वापर करण्यात आला. हे जोखमीचे परंतु महत्त्वाचे काम अशोक वाडेकर, सुभाष सोनवणे आणि त्यांच्या परिवाराने यशस्वीरित्या पार पाडले. रथासमोर पारंपरिक मशाली पेटविण्याचे कार्य परशुराम अहिरे आणि नितीन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. राघो गणपत पाटील यांच्या घराण्यास रथोत्सवात देवाचे चोपदार म्हणून मान आहे, जो परंपरेनुसार सध्या प्रा. गिरीश पाटील पारंपरिक पोशाखात निभावत आहेत.

या सोहळ्यात सयाजी पाटील परिवार, त्यांचे मित्रपरिवार तसेच पाचोरा शहरातील असंख्य भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण रथयात्रेदरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत कार्यक्रम सुरळीत पार पाडला.

श्री बालाजी महाराजांचा हा रथोत्सव पाचोरा नगरीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभाव, श्रद्धा आणि सामूहिकतेचा अनोखा संगम यात दिसून आला.