धक्कादायक : दुसऱ्या पुरुषासोबत पाहिले, ‘अनैतिक संबंधां’च्या संशयातून दगडाने ठेचून संपवले!


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात ‘अनैतिक संबंधां’च्या संशयातून एका प्रियकरानेच दुसऱ्या एका व्यक्तीचा दगडाने आणि काठीने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयासमोरील जुन्या, बंद पडलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या गेटजवळ शनिवारी (२४ मे) सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच संशयित आरोपी राजू काशीराम बारेला (वय ३५, रा. मध्यप्रदेश, ह.मु. चोपडा) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू बारेला हा त्याची ओळखीची महिला प्यारी बारेला (नाव बदललेले) हिच्यासोबत कचरा वेचून शहरातील जुन्या बंद पडलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात एकत्र राहत होता. शुक्रवार, २४ मे रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास राजू बारेला घरी परतला. त्यावेळी त्याची सोबत राहणारी प्यारी बारेला ही एका दुसऱ्या अज्ञात व्यक्तीसोबत झोपलेली असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. दोघांचे ‘अनैतिक संबंध’ असल्याचा विचार राजूच्या मनात येताच, आणि त्या दोघांना सोबत झोपलेले पाहून राजू बारेला यांची तळपायाची आग मस्तकाला पोहोचली.

रागाच्या भरात त्याने कोणताही विचार न करता, जवळ पडलेल्या लाकडी काठीने त्या अज्ञात व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिथेच असलेला मोठा दगड उचलून त्या व्यक्तीच्या डोक्यात वारंवार टाकून निर्घृणपणे खून केला. हा खून केल्यानंतर राजू बारेला तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला.

शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही भीषण घटना उघडकीस आली. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर, चोपडा शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी राजू बारेला याचा शोध घेतला. अखेर, पोलिसांना गोरगावले रोडवरून त्याला अटक करण्यात यश आले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी राजू काशीराम बारेला याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.