भीषण अपघात: उड्डाणपुलावरून ट्रक कोसळला, दोघे गंभीर जखमी


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बिलाखेड गावाजवळ शनीवारी भीषण अपघात घडला आहे. देवी अहिल्या होळकर उड्डाणपुलावरून एक भरधाव ट्रक खाली कोसळल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकमधील दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिलाखेड गावाजवळील देवी अहिल्या होळकर उड्डाणपुलावरून जात असताना ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक थेट पुलावरून खाली कोसळला. ट्रक खाली कोसळल्याचा आवाज ऐकून आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.