राहूल गांधी यांना धक्का : शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | बदनामीच्या खटल्यात दोन वर्षे शिक्षा झाल्याच्या प्रकरणात राहूल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. यामुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. यामुळेच त्यांची खासदारकी देखील गेली होती. दरम्यान, या निर्णयावर पुर्नविचार करणारी याचिका दाखल करत राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावपणी पूर्ण होऊन ही याचिका आज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मोदी आडनावाचे सर्व चोर आहेत’ असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. याप्रकरणी भाजपा नेते पूर्वेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत येथील सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या सर्व लोकांची बदनामी केल्याचा आरोप पूर्वेश मोदी यांनी केला होता. यातूनच राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती.

दरम्यान, आज उच्च न्यायालयाने राहूल गांधी यांना दिलासा न दिल्यामुळे ते या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, दुसरीकडे अनेक नेत्यांनी कोर्टाच्या या निर्णयावर जोरदार टिका केली आहे.

Protected Content