चंद्रकांत पाटलांवर आमदार रोहित पवारांची टीका

 

अहमदनगर: वृत्तसंस्था । राज्यातील 30 साखर कारखान्यांची चौकशी करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

 

चंद्रकांतदादांचे हे पत्रं राजकीय हेतूने प्रेरित आहे. हा सर्व सरकार पाडण्यासाठीचा खटाटोप आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

 

रोहित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांनी 30 साखर कारखान्यांवर कारवाई करण्याबाबतचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेले पत्र राजकिय हेतूने पाठवलेले आहे. त्या पत्राबरोबर पाटलांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय मांडायला हवा होता. राज्य सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्याचे 30 हजार कोटी रुपये केंद्राकडे अडकले आहेत. ते आणण्यासाठी देखील त्यांनी वेगळे पत्रं लिहायला हवे होते. राज्यांच्या इतर अडचणी त्यांना दिसत नाही. त्यावर पत्रं लिहायला जमत नाही. हे सगळं राजकीय हेतूने सुरू असून सरकार पाडण्यासाठीच्या या हालचाली आहेत, असं पवार म्हणाले.

 

 

त्यांनी पाठवलेलं पत्रं राजकीय हेतूने लिहिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे काय चौकशी व्हायची ते होऊन जाऊ द्या. पण चौकशी पारदर्शक व्हावी. कारखान्यांची पार्श्वभूमी काय होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. चक्रीवादळ आलं. तेव्हा पंतप्रधान केवळ गुजरातला गेले. गुजरातला निधी दिला. ते महाराष्ट्रात आले का?, असा सवालही त्यांनी केला.

 

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या कथित भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मागे मी भाजप नेते राम शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला गेलो होतो. त्यामुळे शिंदे लगेच राष्ट्रवादीत येणार असं म्हणता येईल का? काही संबंध असतात. ओळखी असतात. त्यामुळे भेटीगाठी होत असतात, असं सांगतानाच शिवसेना शब्दाला पक्की आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी आहे, असं ते म्हणाले.

 

या दोन्ही नेत्यांची भेट झाली असेल तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते ऐकत नाही, समजून घेत नाही. भाजपचं जे काही चाललंय ते राजकीय हेतूने चाललं आहे. ते बरं नाही, असं राऊत यांनी शेलारांना सांगितलं असेल, असा चिमटा त्यांनी काढला. भाजपच्या राजकारणामुळे विकासाकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र विकासात मागे पडू शकतो. अशा प्रकारचे राजकारण करू नका. बाकीच्यांना कळत नसेल तुम्ही तरी त्यांना समजवा, असंही राऊत यांनी शेलारांना सांगितलं असेल, असंही ते म्हणाले.

 

तीन महिने हे सरकार टीकणार नाही असं म्हटलं जात होतं. आता दोन वर्षे होतील, असे करत करत पाच वर्ष कधी जातील हे कळणार नाही, असं सांगतानाच आता भाजपचा खरा चेहरा समोर येत चाललाय. भाजप उघडे पडत चालले आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना नुकसान होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

 

Protected Content