शिवसेनेची चार मते कॉंग्रेस उमेदवाराला !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेने आपली चार मते ही कॉंग्रेसच्या उमेदवाराला देण्याची रणनिती आखली असून यामुळे विधानपरिषदेचा सामना अजून रंगतदार होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी राज्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. यात आज पहाटेपर्यंत चारही पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला होते असे दिसून आले. यात विशेष करून कुणाला आणि कशा प्राधान्य क्रमाने मतदान करावे याचे नियोजन करण्यात आले. यानंतर आज सकाळी नऊ वाजेपासून सर्वच पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल होऊ लागले आहेत.

भाजपकडे चार जागा निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेली मते असताना पाचवा उमेदवारही मैदानात उतरवण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आधी ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे दिसत असतांना निवडणूक लागली. दरम्यान, विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होणार आहे. यात कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी अडचणी असल्याने रात्री उशिरापर्यंत कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या बैठकीनंतर अखेर शिवसेनेनं आपल्या वाट्याची चार मते कॉंग्रेसला देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. असे झाल्यास भाजप समोरील अडचणी वाढणार आहेत.

Protected Content