शिवसेनेची मागणी – ठोकून काढा !

मुंबई प्रतिनिधी । पुलवामा येथील हल्ल्याचा बदल घेण्यासाठी पाकला ठोकून काढा अशी मागणी आज शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनामध्ये ठोकून काढा या शीर्षकाच्या अंतर्गत अग्रलेखातून शिवसेनेने केंद्र सरकारला आक्रमक भूमिका घेण्याची मागणी केली आहे. यात नमूद केले आहेत की, पुलवामा येथील हल्ल्याने देश हादरला आहे, आक्रोश करीत आहे. हिंदुस्थानी लष्करावर आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या सर्वात मोठया हल्ल्याने राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. नेहमीप्रमाणे हा हल्ला भ्याड असल्याच्या सरकारी आणि राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर आणि सशस्त्र फौजफाटयांवर हल्ला करणे व आमचे अतोनात नुकसान करणे यास भ्याड हल्ला कसे काय म्हणू शकता? आमच्या अति आणि फाजील आत्मविश्‍वासावर केलेला हा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाटांनी काय होणार? देशात अशा लाटा कधी संतापाच्या असतात तर कधी राजकीय विजयोन्मादाच्या असतात. त्या लाटांच्या तडाख्यांनी ना कश्मीर प्रश्‍न सोडवला ना जवानांची बलिदाने रोखली. जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. म्हणजे ते नेमके काय व कसे करणार आहेत? असा प्रश्‍न यात विचारला आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, आधी सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय ते नीट समजून घ्या. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला दोन तासांत खतम केले. त्याला म्हणतात सर्जिकल स्ट्राइक! तालिबानच्या म्होरक्यांना त्यांच्या घरात घुसून अमेरिकेने मारले, पण प्रे. ट्रम्प आज कश्मीरातील हल्ल्यांचा फक्त निषेध करीत आहेत. ट्रम्प हे मोदींचे सच्चे दोस्त असतील तर त्यांनी ङ्गलादेनफप्रमाणेच मसूद अजहरचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेचे कमांडोज पाकिस्तानात घुसवायला हवेत. एकटा पडलेला पाकिस्तान हिंदुस्थानात घुसून आमच्यावर भयंकर हल्ले करीत आहे. मोदी यांना आमचे हात जोडून एकच सांगणे आहे, पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे पहा. बदला घेण्याची भाषा केलीच आहे, ती कृतीत उतरवून दाखवा. पाकिस्तानला ठोकून काढा! ठोकून काढा!! ही राजकारण करण्याची वेळ नाही. जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ असल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे.

Add Comment

Protected Content