‘ही’ मंडळी हुतात्म्यांचा अपमान कशी सहन करू शकतात : शिवसेना

मुंबई । महाराष्ट्र हा जितका शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा आहे तितकाच तो भाजपचाही असायला हवा. यामुळे महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कशी सहन करू शकतात ? असा प्रश्‍न आज शिवसेनेने उपस्थित केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामना मध्ये आज पावसाळी अधिवेशनाबाबत भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचे आहे. ते आजपासून सुरू होत आहे. पावसाळा संपत आल्यावर हे घटनात्मक सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस सरकार पक्षाने आणि विरोधकांनी एकत्र बसून राज्यातील अनेक प्रश्‍नांवर, सभागृहातील कामकाजावर चर्चा करायची असते. सभागृहात सरकारला धारेवर धरण्याचा पूर्ण अधिकार विरोधकांना आहेच, पण सरकारचे चहापानच नाकारायचे हा कसला शिष्टाचार? हा शिष्टाचार यावेळी सरकारने स्थगित केला. त्यामुळे विरोधकांच्या हातचे एक खेळणेच काढून घेतले. एका चांगल्या परंपरेत खंड पडला हे खरेच, पण त्यास कोरोना इतकाच विरोधी पक्षांच्या एकांगी भूमिकाही जबाबदार आहेत.

यात पुढे म्हटले आहे की, आज महाराष्ट्रापुढील नेमके प्रश्‍न काय आहेत? देशातील कोरोनाची रुग्णसंख्या ४० लाखांवर गेली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २० हजार ४८९ नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य हीच आताच्या घडीला सरकारची प्राथमिकता आहे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत दिवसाला १९०० च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने हे आव्हान अधिक आहे अशी चिंता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. हीच चिंता संपूर्ण राज्याची आहे, पण विरोधी पक्ष या चिंताजनक परिस्थितीवर सभागृहात धडपणे चर्चा करू देणार आहे काय? विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ङ्गराष्ट्रीय हितांच्याफ विषयांवर प्रश्‍न उपस्थित केले जातील. खरे तर मुंबई म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करणा़र्‍या उप़र्‍या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, पिऊन तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी.

मुंबई शहर हे देशातील गुन्हेगारांचे डम्पिंग ग्राऊंड होत असेल तर त्यास ती ती राज्ये जबाबदार आहेत. तुम्ही घाण करायची व मुंबई पोलिसांनी साफ करायची, हे थांबवायचे असेल तर मुळांनाच हात घालावा लागेल. इतरही अनेक गंभीर विषय आहेतच. विधिमंडळात अशा अनेक प्रकरणांना न्यायप्रिय आमदारांनी वाचा फोडली तरी पुरे. दोन दिवसांच्या अधिवेशनात काय काय घडते ते पाहायचे, की कोरड्या वातावरणातील गोंगाटात हे पावसाळी अधिवेशनही वाहून जाते ते दिसेलच असे यात म्हटले आहे.

Protected Content