मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वत:साठी खड्डा खणणे- शिवसेनेचा इशारा

मुंबई । मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असल्याचा इशारा शिवसेनेने आज दिला असून या माध्यमातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

दैनिक सामानातील आजच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीकस्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळया वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्‍न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना घडलेले दिसत होते. महाराष्ट्रातच राष्ट्र आहे व महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे आमच्या सेनापती बापटांनी सांगूनच ठेवले आहे. पण वाद उकरला जातो तो मुंबईच्या बाबतीत. त्यात एक राजकीय पोटदुखी आहेच.

यात पुढे म्हटले आहे की, डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण महाराष्ट्रद्वेष्टया मंडळींबरोबर खुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱया विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात जसे अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेखांसारखे शूर होते तसे काही अस्तनीतील निखारेही होतेच. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळायची राहिली काय? असे सवाल यात करण्यात आला आहे.

यामध्ये पुढे म्हटले आहे की, बॉलिवूड नामक हिंदी सिनेसृष्टीचा तंबू मुंबईत रुजला व एक उद्योग म्हणून तो फोफावला. या सिनेसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके नामक एका मराठी माणसानेच घातला. त्या वृक्षाची गोड फळे आज मुंबईत सर्वच भाषिक कलाकार खात आहेत. फाळक्यांनी उभारलेल्या मायानगरीतील अनेकांना ङ्गभारतरत्नच काय तर निशाने पाकिस्तानपर्यंतचे किताब मिळाले. तशी कधी मराठी, तर कधी पंजाबी मंडळींची चलती होतीच. पण मधुबाला, मीनाकुमारी, दिलीप कुमार, संजय खानसारख्या दिग्गज मुसलमान कलावंतांनी पडद्यावरील आपली नावे हिंदू केली. कारण तेव्हा येथे धर्म शिरला नव्हता, तर कला-अभिनयाचेच नाणे खणखणीतपणे वाजवले जात होते. घराणी संगीतात आहेत. दिग्दर्शनातसुद्धा आहेत. पण यापैकी प्रत्येकाने मुंबईलाच आपली कर्मभूमी मानली. नव्हे, मुंबईच्या जडणघडणीत योगदान दिले. पाण्यात राहून माशाशी वैर केले नाही किंवा स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱयांच्या घरावर दगड मारले नाहीत. ज्यांनी ते मारले ते मुंबई-महाराष्ट्राच्या शापाचे धनी ठरले. मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असा हा प्रकार आहे असे यात म्हटले आहे.

Protected Content