शिवसेनेने आधी भाजपसोबतचे नाते तोडावे- मलिक

4Nawab Malik 14

मुंबई प्रतिनिधी । राज्यात सत्तास्थापनेबाबत बोलणी करण्याआधी शिवसेनेने आधी भाजपसोबत नाते तोडावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाने आपण सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आता सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी पत्रकार परिषद घेत विद्यमान घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही सध्या राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत. ते काय निर्णय घेतात, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. शिवसेनेने आधी भाजपसोबतचं नातं तोडलं पाहिजे. त्यांनी केंद्रसरकारमधून बाहेर पडतानाच एनडीएमधूनही बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं पाहिजे. नाहीतर केंद्रात सत्तेत आणि राज्यात वेगळ्या आघाडीत असं चित्रं निर्माण होईल. त्यामुळे शिवसेनेने एनडीएतूनबाहेर पडून सत्ता स्थापनेबाबतचा रितसर प्रस्ताव द्यावा. त्यांच्या अटी-शर्तीही सांगाव्यात. त्यानंतर आम्हाला काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेता येईल. शिवसेनेचा रितसर प्रस्ताव आल्यावरच चर्चा पुढे जाईल अशी माहिती त्यांनी दिली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुरेसे संख्याबळ नसल्याने आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचेही मलीक यांनी स्पष्ट केले.

Protected Content