निधी वाटपावरून शिवसेनेचे आमदार नाराज

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत आपल्यावर निधी वाटपात अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या २५ आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेच्या २५ आमदारांनी निधीबाबत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल, भरत गोगावले, वैभव नाईक यांच्या नेतृत्वात हे आमदार मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी देण्यात आले आहेत त्यात कॉंग्रेस आमदारांच्या मतदारसंघांसाठी ९०० कोटी रुपये, राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी ७०० कोटी रुपये, तर शिवसेना आमदारांसाठी केवळ ३०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुन्हा तोच प्रकार होणार असेल तर आम्ही अर्थसंकल्प सादर होताना विधानसभेत बसणार नाही. सभागृहाच्या लॉबीत किंवा बाहेर विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसू, असे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांची याची गंभीर दखल घेऊन हा अन्याय दूर करण्याचे या आमदारांना सांगितले.

शिवसेनेच्या अनेक आमदारांमध्ये निधी वाटपातील दुजाभावाबाबत नाराजी आहे. विशेष करून वित्त विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा या राष्ट्रवादीकडील खात्यांकडून निधी वाटपाबाबत दुजाभाव केला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच आता कॉंग्रेसकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातूनही हीच वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी या आमदारांनी केल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याची तातडीने दळळ घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावून घेत त्यांना या तक्रारीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिल्याचे वृत्त आहे.

 

 

Protected Content