पत्नी उच्चशिक्षित ,कमावण्यास पात्र असेल तरी पोटगी द्यावीच लागेल — उच्च न्यायालय

 

नागपूर : वृत्तसंस्था ।  महिला उच्चशिक्षित असेल व ती कमावण्यास पात्र असेल तरी तिला पोटगी नाकारता येत नाही, असे मत व्यक्त करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने  तात्पुरती पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले.

 

काही वर्षांपूर्वी एका तरुणीचा विवाह डॉक्टर तरुणाशी झाला. विवाहानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. हळूहळू कौटुंबिक कलह वाढला. यातून दोघेही विभक्त झाले व पत्नीने कौटुंबिक न्यायालयात पोटगीचा अर्ज केला.

 

या अर्जावर सुनावणी घेऊन कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला तात्पुरती पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले. त्या आदेशाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. या अर्जावर न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

 

त्यावेळी पतीने पत्नी ही एमएससी पदवी प्राप्त आहे. ती स्वत: कमावण्यास पात्र आहे. त्यामुळे तिला पोटगी देण्याचे आदेश रद्द ठरवण्याची विनंती केली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पत्नी कमावण्यास पात्र असली तरी पोटगीचा अर्ज करतेवेळी ती कमावत नसेल तर तिला तात्पुरती पोटगी मिळायला हवी. पत्नी केवळ उच्चशिक्षित आहे म्हणून पोटगी नाकारता येत नाही, असे स्पष्ट केले. सोबतच पतीचा अर्ज फेटाळून कौटुंबिक न्यायालयाला सहा महिन्यात  वादाचा  निपटारा करण्याचे आदेश दिले.

 

Protected Content