नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप सोबत नसेल तर शिवसेनेला लोकसभेत तीन-चार जागा देखील मिळतील की नाही याबाबत संशय आहे. भाजपविना शिवसेनेची कॉंग्रेसप्रमाणेच दयनीय अवस्था होणार असल्याचे नमूद करत त्यांनी पुन्हा एकदा भाजपची सोबत करावी असा सल्ला देखील दिला आहे.
चार राज्यांमधील सत्ता मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास उंचावला असून याचे राज्याच्या राजकारणावरही पडसाद उमटण्याचे संकेत मिळू लागले आहेत. या पार्श्वभूमिवर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना सरकारवर टीका केली आहे.
आठवले म्हणाले की, भाजपच्या विजयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे. त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी गुंडाराज संपवले. त्यांनी केलेल्या विकासकामामुळे यूपीमध्ये भाजपचा विजय झाला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सत्ता मिळाली. मी बोललो होतो, पण ते झाले नाही आणि आप सत्तेत आली. पंजाबमधील लोकशाहीचा कल आम्हाला मान्य आहे. ही निवडणूक २०२४ च्या लोकभेची चाचणी होती. आता दोन वर्षांनी भाजपला ४००च्या वर जागा मिळतील असा दावाही आठवले यांनी केला. भाजपशिवाय शिवसेनेला यश मिळणार नसल्याने त्यांनी पुन्हा सोबत येण्याचे आवाहन देखील केले.
दरम्यान, रामदास आठवले म्हणाले की, लोकांना कॉंग्रेस नको होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायदे मागे घेतले. मात्र, पंजाबमध्ये भाजपची ताकद कमी पडली. पुढच्यावेळी आम्ही आम आदमी पक्षाला सत्तेतून बाहेर करू, असा इशाराही त्यांनी दिला. राहुल गांधी भाजपला विरोध करतात. मात्र, त्यांचेच नुकसान होतेय. प्रियांका गांधी यांचीही जादू उत्तर प्रदेशमध्ये चालली नाही. कॉंग्रेस पक्ष आता दिसेनासा झाला आहे. पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. कॉंग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. राहुल गांधी यांनी उठसूट नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू नये. त्यामुळे भाजपचा फायदा होतो, असा दावा त्यांनी केला.