सरकारी जागेवर अतिक्रमण केले – सदस्यत्व गमवले

साकेगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे साकेगाव ग्रामपंचायत सदस्य कुंदन अशोक कोळी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

 

साकेगाव ग्रामपंचायतीची २०२०-२१ निवडणूक चुरशीच्या निवडणुकीत कुंदन अशोक कोळी हे निवडून आले होते. दरम्यान, कुंदन अशोक कोळी यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याची तक्रार प्रवीण मोहन पवार यांनी केली. या तक्रारीच्या अनुषंगाने भुसावळ गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यामध्ये कुंदन कोळी व त्यांचे वडील अशोक काशिनाथ कोळी यांचे हिंदू एकत्र कुटुंब असून त्यांनी साकेगाव ग्रामपंचायतीच्या सर्व्हे नं. ३ ब व २७० व प्लॉट ४८ व ४९ मध्ये अतिक्रमण केले असल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री. कोळी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३) च्या तरतुदीचा भंग केला असल्याचे सिद्ध होत असल्याने ते ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरतात असा अहवाल दिला. हायकोर्टाने जानेवारी २०१५ मध्ये दिलेल्या निकालात, ग्रामपंचायत सदस्याने स्वतः अथवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले तर तो सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतो, असे निर्देश देण्यात आले आहे. त्याचा आधार घेऊन कोळी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच आज दि. १७ मार्च रोजी अर्जदार प्रवीण पवार यांनी नाशिक आयुक्त यांच्याकडे सदरील निकालावर कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.

Protected Content