नगरपंचायतीच्या लेटरपॅडचा गैरवापर : गुन्हा दाखल

शेंदुर्णी, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या लेटरपॅडचा गैरवापर करत मुख्याधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी करून माहिती अधिकार कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याबाबत खोटी माहिती देणार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की शेंदुर्णी नगर पंचायत लेटर पॅड वापरून शेंदुर्णी येथील ६ माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या नावे खोट्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यातील ३ व्यक्तींना नोटीस प्राप्त झालेल्या आहेत. तसेच नोटीस मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व नियोजन समिती सदस्य संजय गरूड यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे. त्या विषयी संजय गरूड यांनी मुख्याधिकारी साजीद पिंजारी यांचे कडे लेखी पत्र देऊन सदर नोटीस बद्दल खुलासा मागितला होता. यात हा सर्व बनावट प्रकार असल्याचे उघड झाले.

यात कुणी तरी अज्ञात व्यक्तीने येथील नगरपंचायतीच्या लेटरपॅडचा गैरवापर करत मुख्याधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी करून माहिती अधिकार कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याबाबत खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने नगर पंचायत कार्यालयाच्या मार्फत कार्यालय अधीक्षक सोनजे यांच्या फिर्यादवरून नगर पंचायत लेटर पॅडचा गैरवापर व बनावट सही प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खळबळ उडाली असून यामागे कोण असावे ? याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content