पत्नीच्या मैत्रिणीला पळवून नेणार्‍या डॉक्टरचा प्रयत्न फसला

जळगाव प्रतिनिधी । आपल्या पत्नीच्या जीवलग मैत्रीणीवर प्रेमाचे जाळे टाकून तिच्यासोबत विवाहाच्या तयारीत असणार्‍या शेंदुर्णी येथील डॉक्टरचे बिंग पोलिसांच्या सतर्कतेने फुटले आहे.

या घटनेचा तपशील असा की, पहूर (ता. जामनेर) येथील दोन तरूणी एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी होत्या. यातील एका तरूणीने शेंदुर्णी येथील डॉक्टरसोबत विवाह केला. याच विवाहात तिच्या मैत्रीणीची त्या डॉक्टरसोबत ओळख झाली.

पुढे डॉक्टरने तिच्या पत्नीच्या मैत्रीणीशी सुत जुळवले. अलीकडेच या तरूणीचा साखरपुडा झाला. यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्नाचा निर्णय घेतला. यासाठी संबंधीत डॉक्टरने अतिशय चतुर प्लॅन बनविला. त्याने एकाच ओळखपत्रावर दोन सिमकार्ड खरेदी केले. दोन मोबाइल घेतले. याच मोबाइलवर दोघांचा संपर्क सुरू होता. दरम्यान, त्याने २९ ऑक्टोबर रोजी या मुलीस पहूर येथून सोबत घेत पाचोर्‍याला नेले. तेथून एका कारमधून श्रीरामपूर येथील एका मित्राकडे तिला पाठवले. इकडे तिच्या कुटुंबीयांनी पहूर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली. या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा भलताच प्रकार समोर आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, शशिकांत पाटील, श्रीराम धुमाळ, अनिल देवरे, ज्ञानेश्‍वर ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर यांच्या पथकाने या तरुणीस श्रीरामपूर येथून ताब्यात घेतल्यानंतर संबंधीत डॉक्टरने आखलेल्या प्लॅनचे बिंग फुटले. अर्थात, संबंधित तरुणीने स्वत:च्या इच्छेने श्रीरामपूर येथे गेल्याचा जबाब दिल्यामुळे डॉक्टरच्या विरूध्द या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Protected Content