अवैध गौण खनिज प्रकरणात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा- पल्लवी सावकारे

जळगाव प्रतिनिधी । अवैध गौण खनिज प्रकरणात बोगस पावत्यांसाठी राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला असल्याने संबंधीत दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

कुर्‍हा-वराडसीम गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी अवैध गौण खनिज प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाच्या नावे असलेल्या बनावट वाळूच्या पावत्या बनवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी त्या आज जिल्हाधिकार्‍यांकडे आपली बाजू मांडणार आहेत. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी या प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शासकीय कामांसाठी वाळूच्या बोगस पावत्यांचे रॅकेट संगनमताने चालवण्यात आले आहे. यात पावतीवरील राजमुद्रेचा दुरुपयोग करण्यासह शासकीय निधी लाटण्यात आला आहे. त्यामुळे संबधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या रॅकेटमध्ये ठेकेदार, अभियंत्यासह अनेक मोठे अधिकारी असल्याने तातडीने चौकशी करण्याची मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.

या प्रकरणात माहिती अधिकारात माहिती मागवूनही संबधित विभागाने माहिती दिली नाही. लघुसिंचन, जलसंधारण, बांधकाम या विभागातील कामे ही बोगस पावत्याप्रकरणी संशयाच्या भोवर्‍यात आहेत. ठेकेदार, शाखा अभियंत्यापासून संबधित विभागाचे प्रमुख, लेखा परीक्षक यांच्यापर्यंत यंत्रणेतील अनेकांचा यात सहभाग आहे. संगनमताने हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करण्यात आलेला आहे. पावतीवर देशाची राजमुद्रा छापलेली असून या बोगस दस्ताऐवजाचा वापर करून शासनाचेच पैसे लाटण्यात आलेले आहेत. या प्रकरणी यंत्रणेकडून आतापर्यंतच संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज होती. परंतु, सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.

दरम्यान,जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केलेल्या तक्रारीवर आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सुनावणी होणार आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण अधिकारी यांच्या नावे नोटीस काढली आहे. या प्रकरणाच्या तक्रारदार सावकारे यांनाही उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

Protected Content