शेंदुर्णी नगरपंचायततर्फे ध्वजारोहणानंतर हरीत शपथ

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील नगरपंचायतमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर माझी वसुंधरा उपक्रमाच्या अंतर्गत हरीत शपथ घेण्यात आली.

प्रजासत्ताक दिनी येथील नगरपंचायतच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर माझी वसुंधरा अंतर्गत हरीत शपथ घेण्यात आली. या सोबत घनकचरा डेपो व बौद्ध स्मशान भुमि येथे नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे,उपनगराध्यक्षा सौ. चंदाबाई अग्रवाल,मुख्याधिकारी साजिद पिंजारी,सर्व नगरसेवक व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थित वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. या परिसरात वड,पिंपळ,गुलमोहर,उंबर,करंज,पुत्रंजिवा,चिंच व बकुळ अशी भारतीय प्रजातींचे वृक्ष लावण्यात आले.

संपूर्ण शेंदुर्णी हिरवेगार व्हावे या हेतूने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे व भविष्यातही करण्यात येत आहे. निसर्गाचा समतोल राखावा, शेंदुर्णी शहर प्रदूषणमुक्त राहावे, यासाठी माझी वसंधुरा अभियान सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे यांनी सांगितले. सर्वांना स्वच्छता, आरोग्य, निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्‍चित करण्यासाठी तसेच वसुंधरेशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदलाचे महत्त्व सांगून स्वच्छ व सुंदर शेंदुर्णी कसे करता येईल, यासंदर्भात उपनगराध्यक्षा सौ. चंदाबाई अग्रवाल यांनी माहिती दिली.

माझी वसुंधरा हे अभियान शासन संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे.ही केवळ सरकारी मोहीम किंवा अभियान न राहता प्रत्येकाने पर्यावरणातील बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक केली पाहिजे.या मोहिमेत वृक्ष लागवडी बरोबर वृक्षाचे संवर्धन करणे व शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे याची संकल्पना व माहिती मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी दिली.

Protected Content