Home क्राईम जामनेरात एलसीबीची बोगस बियाण्यांच्या गोदामावर कारवाई !

जामनेरात एलसीबीची बोगस बियाण्यांच्या गोदामावर कारवाई !

0
7


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. जामनेर शहरातील साईनाथ नगर परिसरातील एका घरगुती गोदामावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 9 लाख १५ हजार ४१६ रुपयांच्या किमतीची १ हजार १६ संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना साईनाथ नगर, वाकी रोड परिसरात राहणारा दीपक राजमल चौधरी याने आपल्या घरात बेकायदेशीररीत्या एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा करून ठेवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री सुमारे ११.४५ वाजता संबंधित घरावर छापा टाकला.

झडतीदरम्यान घरातील एका खोलीत ३९ पॅकबंद व एक उघडलेली अशा एकूण ४० गोण्यांमध्ये साठवून ठेवलेली १ हजार १६ कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये ‘Diya-59 (KDCHH 02 BG II)’ व ‘Krish-45 (KDCHH 065 BG II)’ या वाणांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ९ लाख १५ हजार ४१६ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान जप्त बियाण्यांवर उत्पादक म्हणून अहमदाबाद येथील ‘गोल्ड किंग बायो जीन्स प्रा. लि.’ तसेच विक्रेता म्हणून ‘हायलंड हायब्रीड सीड्स’ यांचा उल्लेख आढळून आला. मात्र, संबंधितांकडे बियाण्यांच्या खरेदी, साठवणूक अथवा विक्रीसंदर्भातील कोणतेही वैध परवाने, बिले किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड झाले.

पुढील चौकशीत दीपक चौधरी याने गुलाब आधार पाटील, भूषण पाटील आणि तुकाराम कोळी यांच्या मदतीने ही बियाणे धरणगाव तालुक्यातील पिंपरी परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी बियाणे निरीक्षक राजू बळीराम ढेपले यांच्या फिर्यादीवरून दीपक राजमल चौधरी (रा. साईनाथ नगर, जामनेर), गुलाब आधार पाटील (रा. वर्डी, ता. चोपडा), भूषण पाटील (रा. वर्डी, ता. चोपडा) आणि तुकाराम कोळी (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करीत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर बियाण्यांच्या विक्री व साठवणुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले असून, शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत व प्रमाणित बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सदरची कार्यवाही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगांव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक प्रशांत दरेकर यांचे नेतृत्तवाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि प्रमोद वाघ, पो. ना. हेमंत पाटील, पो.कॉ. ईश्वर पाटील, पो. कॉ. राहुल महाजन या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


Protected Content

Play sound