भुसावळ येथे सात अर्ज अवैध : दोन्ही हरकती फेटाळल्या

bhusaval arj

भुसावळ, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघात आज (दि.५) झालेल्या छाननीनंतर सात उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत तर २२ अर्ज वैध आहेत. त्याचवेळी वराडसीम येथील अपक्ष उमेदवार जानकीराम सपकाळे यांनी दोन उमेदवारांबाबत घेतलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्या आहेत.

 

येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे, तहसिलदार दीपक धिवरे यांच्यासह सर्व उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व वकिलांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली.

या छाननीत भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे, राष्ट्रवादीचे जगन सोनवणे, एआयएमआयएमचे नगरसेवक रवींद्र सपकाळे, मनसेचे निलेश सुरडकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.सुनील सुरवाडे, बसपाचे राकेश वाकडे, अपक्ष संजय ब्राह्मणे, डॉ.मधू मानवतकर, यमुना रोटे, गीता खाचणे, कैलास घुले, प्रतिभा शिरसाठ, जानकीराम सपकाळे, राजेंद्र सपकाळे, सुरेश भोसले, राजेश इंगळे, नगरसेवक विष्णू खोले, अजय इंगळे या सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले आहेत तर रजनी सावकारे यांनी भाजपतर्फे दाखल केलेला अर्ज पर्यायी उमेदवार असल्याने, काँग्रेसतर्फे संजय ब्राह्मणे शिवसेनेतर्फे निलेश देवगाठोळे, राष्ट्रवादीतर्फे पुष्पा सोनवणे, डॉ. मधु मानवतकर या उमेदवारांनी पक्षाचे ए.बी.फॉर्म न जोडल्याने त्यांचे सात उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

या छाननीत सतीश घुले यांनी नामनिर्देशन पत्रात गुन्‍ह्‍याबाबत माहिती लपवली व वराडसीमच्या सरपंच गीता खाचणे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची हरकत वराडसीमचे उमेदवार जानकिराम सपकाळे यांनी घेतली होती. मात्र श्री.सुलाणे यांनी दोन्ही हरकती फेटाळत त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला देत दोघांचे अर्ज वैध ठरवले आहेत.

Protected Content