फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे कैडेट व वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्ष बी कॉम शाखेतील विद्यार्थी अजय चौधरी यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या औचित्याने आयोजित दिल्ली येथे राजपथावर पथसंचलनासाठी महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देशातील युवा पिढीला एकता आणि शिस्त या माध्यमातून भारतीय सशस्त्र सेनेच्या पूर्वतयारी चे प्रशिक्षण दिले जाते. सद्यस्थितीत राष्ट्रीय छात्र सेना जगातील सर्वात मोठी युनिफॉर्म यूथ ऑर्गनायझेशन असून आर डी सी कॅम्प दिल्ली साठी निवड होणे सर्वच कैडेट्सचे स्वप्न असते. यात रणगाव तालुका रावेर येथील श्री दौलत अभिमन चौधरी व प्रमिला दौलत चौधरी या अत्यंत स्वाभीमानी, प्रामाणिक, मेहनती आणि अत्यंत संस्कारक्षम पालकाच्या पोटी जन्मलेल्या अजय याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन धनाजी नाना महाविद्यालयात एनसीसीत प्रवेश मिळवला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी व एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत कठीण मेहनत व कठोर परिश्रम घेऊन अजय दौलत चौधरी याने देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल केले आहे. महाविद्यालयाच्या वतीने याआधी विवरे येथील प्रा. भारत दिलीप पाटील व गहुखेड़ा येथील चंद्रकांत मधुकर पाटील या केडेट्स नेही दिल्ली दरबारी महाविद्यालयाची सुवर्ण नोंद केली होती.
या शिरोपेचात अजय दौलत चौधरी यांनी मानाचा तुरा रोवला असल्याची भावना लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी यावेळी व्यक्त केली. अजय चौधरी याने दिल्लीच्या राजपथ येथे पथसंचलनात स्वतःच्या मेहनतीने व परिश्रमाने स्थान मिळवून आमचा गौरव केला आहे व हा आनंद आयुष्यभर संस्मरणीय असेल अशी भावना अजय चे वडील दौलत चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.
तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी आमदार- रावेर/ यावल विधानसभा मतदार संघ, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे, चेअरमन लीलाधर चौधरी, व्हाइस चेअरमन प्रा. किशोर चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर फिरके, सहसचिव अनिल भंगाळे, सर्व व्यवस्थापन व नियामक मंडळ पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा. अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा. दिलीप तायडे, समादेशक अधिकारी 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव कर्नल प्रवीण धीमन, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पवन कुमार, सुभेदार मेजर कोमलसिंग, सुभेदार जयपाल सिंग, सुभेदार जय बहादुर यांच्यासोबत महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कॅडेटस व विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे. अजय चौधरी यांचे अभिनंदन समाजातील सर्वच स्तरातून होत आहे.