मुंबई क्राईम इंटेलिजन्स यूनिटची सूत्रं मिलिंद काथे यांच्याकडे

 

 

मुंबई  वृत्तसंस्था । पोलीस गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची ( क्राईम इंटेलिजन्स यूनिटची)  सूत्रं आता मिलिंद काथे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

 

पोलीस निरीक्षक मिलिंद काथे यांची क्राईम इंटेलिजन्स यूनिटची नियुक्त करण्यात आली . अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस गुन्हे शाखेचा गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग चर्चेत आला होता. वाझे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

 

या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात बराच गदारोळ झाला. यात एनआयएने गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे तत्कालीन प्रमुख सचिन वाझे यांना अटक केली होती. त्याचबरोबर त्यांच्यावर मनसुख हिरेन प्रकरणात सहभागा असल्याचाही ठपका ठेवण्यात आला.

 

स्फोटकं आणि हिरेन हत्या प्रकरणात वाझे यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने त्यांना गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरून दूर करत निलंबित केलं होतं. त्याचबरोबर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे देण्यात आल्यानंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदावर नियुक्तीसाठी चाचपणी सुरू होती. या विभागातील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या. अखेर मिलिंद काथे यांच्याकडे गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत.

 

 

मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर हेमंत नगराळे यांनी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या जागी २४ नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेचे प्रमुख सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी नियुक्त्यासंदर्भातील आदेश काढले. काथे यांच्याकडे गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी देण्यात आली असून, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Protected Content