किनगाव परिसरात चोरटयांचा धुमाकुळ – एकाच रात्री चार घरे फोडली

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथून जवळ असलेल्या कासारखेडा येथे शनिवार दि. २२ रोजी रात्री एक ते साडेतीन वाजेच्या सुमारास चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे.

 

शनिवार दि. २२ रोजी रात्री एक ते तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी येथील रहिवासी निंबा पुना कुंभार यांच्या राहत्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. निंबा पुना कुंभार हे विट व्यवसायाच्या कामासाठी घराला कुलूप लावून गुजरात राज्यांतील सुरत येथे आपल्या परिवारासह गेले होते. शनिवार दि. २२ रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाट तोडून कपाटात ठेवलेले अंदाजे लाखो रुपयांचे दागिने व घरातील संसारोपयोगी पितळी भांडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. निंबा कुंभार यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने चोरट्यांनी घरातून सर्व संसारासाठी लागणारी संसारोपयोगी वस्तू लांबविल्याने कुंभार कुटुंब बेसहारा झाले आहे. निंबा कुंभार यांच्या राहत्या घरातील दरवाज्याचे कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व साहित्यांची तोडफोड करून गोदरेज कपाटाचे लाकर तोडून कपाटात असलेले दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. घरातील साहित्य पत्री पेटी उचलून शेजारीच असलेल्या शेतात फेकून दिलेले आढळून आले. त्या ठिकाणी कपडे व इतर जिन्नस ठेवलेल्या वस्तू पडलेल्या आढळून आल्या.पंरतु निंबा कुंभार हे रात्री उशिरापर्यंत सुरत येथुन कासारखेडा गावी परत आले नसल्याने नेमके किती रक्कम व किती लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.हे मात्र समजू शकले नाही.
तसेच चोरट्यांनी गावातील श्रीराम तापीराम न्हावी यांचे टीव्ही मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिकचे दुकान फोडून त्या ठिकाणावरुन ही इलेक्ट्रिक मोटर व इतर साहित्य चोरून नेले असल्याचे माहिती मिळाली. दरम्यान, श्रीसंत तुकाराम महाराज मंदिर येथील दानपेटी ही चोरट्यांनी फोडून दानपेटीतील किरकोळ रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. मंदिरा शेजारी राहणाऱ्या सुकलाल नामदेव मिस्त्री यांच्या घराचेही दरवाजाचे कडीकोंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला असल्याचे समजते. आडगाव कासारखेडा परिसरात चोरीच्या एकाच दिवशी चार ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निंबा कुंभार यांच्या घरातून चोरी गेलेल्या वस्तू व पत्री पेटी जवळच शेतात आढळून आले. .निंबा कुंभार यांच्या घरातून पितळी मोठी भांडी ही चोरट्यांनी लांबविल्याने चोरटे एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कासारखेडा येथे घडलेल्या या चोरीच्या घटनास्थळी उपनिरीक्षक खैरनार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक खैरनार , पो हे.कॉ .नरेन्द्र बागले, अजित शेख , करीत आहेत.

Protected Content