वाळू वाहतुकदाराकडून लाच घेतांना जळगावच्या प्रांताधिकार्‍यांसह लिपीक जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । वाळू वाहतुकदाराकडून ट्रक सोडविण्यासाठी सव्वा लाख रूपयांची लाच स्वीकारतांना प्रांताधिकारी दीपमाला चौरे व एका लिपीकाच्या वतीने पंटरला रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रांताधिकारी व लिपीकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन त्यांच्याकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचेकडील परवाना असतांना सदर वाळु वाहतुक करणार्‍या दोन ट्रक जळगावच्या तहसिल पथकाने एमआयडीसी परीसरात पकडून सदर ट्रक एमआयडीसी पोलीस स्टेशनला उभे केले होते. संबंधीत ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या वतीने लिपीक अतुल अरूण सानप यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २,००,०००/-रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १,२५,०००/-रुपये लाचेची मागणी करण्यात आली.

दरम्यान, या संदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. या अनुषंगाने आज दुपारी सापळा रचून लिपीक सानप यांच्या खाजगी पंटरने स्वीकारली. याचवेळी त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव परीसरात करण्यात आली.

या प्रकरणी श्रीमती दिपमाला जयपाल चौरे, (वय-३६, उपविभागीय अधिकारी जळगाव भाग, रा- सागरपार्क समोर, रामेश्‍वर शासकीय निवासस्थान, जळगाव) आणि अतुल अरुण सानप, (वय-३२, लिपीक, उपविभागीय अधिकारी कार्यालय,जळगाव भाग, रा-महाजन नगर, दत्त मंदीराजवळ,मेहरुण) यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यात सध्या तरी पंटर आणि संबंधीत लिपीक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांना मात्र अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.

Protected Content