रमजान महिन्याचे लॉक डाऊनच्या नियमानुसार पालन करण्याचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी । मुस्लिम धर्मीयांचे पवित्र रमजान महिन्याची सुरुवात २४ किंवा २५ एप्रिल पासून होत असून या पवित्र महिन्यात रोजा अर्थातच उपवास व तरावीहची नमाजचे अनन्य साधारण महत्व असते. मात्र, मुस्लिम बांधवांनी लॉक डाऊनच्या नियमानुसार रमजान महिना साजरा करावा असे आवाहन मुस्लिम ईदगाह ट्रस्ट व दारुल कजातर्फे करण्यात आले आहे.

रमजान महिन्यात रोजा इफ्तार, जकात जमा करणे व वाटणे हे प्रमुख कर्तव्य मुस्लिम बांधवांकडून या महिन्यात केले जात असतात. परंतु, लॉक डाऊनची परिस्थिती ३ मे पर्यंत असल्याने कालावधीत काय करता येईल याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट दारुल कजा जळगाव जिल्हा प्रमुख मुफ़्ती अतीकउर रहमान व मुस्लिम इदगाह ट्रस्ट चे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी मार्गदर्शन घेतले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी राज्य शासनाचे अल्पसंख्यांक विकास विभागाचे दि. १८ एप्रिल २०२० चे परिपत्रक वाचून समजून सांगितले असून त्यानुसार या पवित्र रमजान महिन्यात सुद्धा लॉक डाऊनच्या अटीचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले. रमजानसाठी पुढील अटी व शर्तींचा समावेश आहे. लॉक डाऊनचे पालन पवित्र रमजान महिन्यात सुद्धा कटाक्षाने व काटेकोरपणे करण्यात यावे, कोणीही मुस्लिम समुदायाच्या लोकांतर्फे मशिदीत नमाज, तरावीहची नमाज किंवा रोजा इफ्तार करता कामा नये. आपल्या घराच्यावर अथवा इमारतीच्या टेरेसवर कोणत्याही प्रकारची नमाज रोजा इफ्तार करता कामा नये. आपल्या परिसरातील मोकळी जागा किंवा ओपन स्पेस वर एकत्रितरित्या नमाज व इफ्तार करू नये. कोणत्याही प्रकारचे सामाजिक ,धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित करता कामा नये. सर्व मुस्लिम बांधवांनी नियमितची नमाज, तरावीहची नमाज व रोजा इफ्तार आप आपल्या घरातच करावे. तीन मे पर्यंत लॉक डाऊन असल्याने याची अंमलबजावणी करावी. जोपर्यंत शासनाचे पुढील आदेश येत नाही तोपर्यंत हे आदेश लागू राहतील. अशा आशयाचे आदेश अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य जयश्री मुखर्जी यांचे आदेशची प्रत देऊन जिल्हाधिकारी यांनी सुद्धा मुस्लिम समुदायास याची अंमलबजावणी करण्याची विनंती केलेली आहे. शासनाचे आदेशाचे दारुल कजा चे मुफ़्ती अतीकुर्रहमान, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी मुस्लिम समुदाय यांना आवाहन केले आहे की, वरील सर्व अटी व शर्ती चे आपण पालन करावे व आपल्या घरातच तरावीहची नमाज व रोजा इफ्तार करण्यात यावे.

Protected Content