खंडणीची मागणी करत टोळक्याचा गोळीबार : भर वस्तीतील घटनेने खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाळू व्यावसायिकाकडून खंडणीसी मागणी करत टोळक्याने हैदोस घालत गोळीबार केल्याची घटना आज रात्री घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात काही दिवसांपूर्वीच भर दिवसा गोळीबाराची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. ही खळबळ शांत होत नाही तोच आज शहरात नव्याने गोळीबाराची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, जळगाव शहरातील के. सी. पार्क परिसरात रात्री आठच्या सुमारास फायरिंग झाली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ममुराबाद रोडवर के. सी. पार्क नावाने कॉलनी असून यात शुभम माने हा वाळू व्यावसायिक राहतो. आज रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर टोळक्याने धुडगूस घालत त्याला खंडणी मागितली. त्याला वरच्या मजल्यावरून खाली बोलावण्यात आले. मात्र ते समोर न आल्याने टोळक्याने खालूनच एकदा गोळीबार केला. यानंतर यातील काही जणांनी वरच्या मजल्यावर येऊन त्यांच्या दरवाजावर दगडफेक करतांनाच पुन्हा गोळीबार केला. अशा प्रकारे या टोळक्याने दोन-तीन फैरी झाडल्या. यानंतर शुभम माने यांना धमकावत या टोळीने तेथून पलायन केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे प्रमुख किसनराव नजन पाटील आदींसह शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात मयूर माने यांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळक्यामध्ये लखन उर्फ गोलू मराठे, लखन शिंदे, नरेश शिंदे, बंटी बांदल, पवन गावढे, केयूर पंधारे आदींसह अन्य आठ-दहा जणांचा समावेश होता. या संदर्भात त्यांनी शहर पोलीस स्थानकात प्राथमिक तक्रार दिली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content