‘कोब्रा’ला पकडतांना सर्पमित्राला दंश; मात्र योग्य उपचार मिळाल्याने वाचल्याची सुखद घटना

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगरात ‘कोब्रा’ला सर्पमित्राने स्वत:चा जीव धोक्यात घालून मोठ्या शिताफिने पकडला. दरम्यान सर्पमित्राला कोब्राने दंश केल्याने त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी फरफट करावी लागली. अखेर वन्य जीव संरक्षक संस्थेच्या अध्यक्षांनी ओळखीच्या वैद्यकिय अधिकारी यांच्या सांगण्यावरून सर्पमित्रावर वेळीच उपचार मिळाले व जीव भांड्यात पडला. जिद्दीने मृत्यूला जिंकल्याची सुखद घटना घडली.

सर्पमित्र रविंद्र भोई यांना गुरूवारी २५ जून रोजी रात्री ११.३० ते १२ वाजेदरम्यान कोब्रा पकडण्यासाठी खंडेरावनगरातून कॉल आला. भोई आपल्या सहकाऱ्यासोबत क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहचले. कोब्रा हा घराच्या पत्र्याच्या आड दडलेला होता. याआधीच उत्साही शिकावू तरूण कोब्रा पकडण्यासाठी पत्र्याच्या छतावर उभा राहून प्रयत्न करीत होता. घरातील सर्व कुटुंब आधीच भयभीत अवस्थेत होते. छतावर चढलेल्या तरूणामुळे कोब्रा पसार होत असतांना सरकत असतांना खाली पडला आणि सर्पमित्र रविंद्र भोई यांच्या हाताच्या अंगठ्याजवळ दंश केला. दंश केल्यानंतरही भोई यांनी कोब्राला जंगलात मुक्तपणे सोडून दिले. दंश होताच सहकारी सर्पमित्र जगदीश बैरागी, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र फालक, बालकृष्ण देवरे, ऋषी राजपूत, निलेश ढाके यांनी भोई यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. कोवीड रूग्णालय असल्याचे सांगून त्यांना उपचार करण्यास मनाई केली. त्यानंतर शाहू महाराज रूग्णालय, आश्विनी हॉस्पिटल, ऑर्किट हॉस्पिटल यांनी रूग्णास दाखल करून घेण्यास नकार दिला. तोपर्यंत ३५ ते ४० मिनिटांपर्यंतचा कालावधी झाला होता. सर्पविषने आपला प्रभाव दाखविण्यास सुरूवात केली. मळमळ, चक्कर येणे, उलटी होणे सुरू झाले होते. रविंद्र फालक हे जिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. बिराजदार यांच्याशी संपर्क साधून गंभीर रूग्ण दाखल करून घेण्यास विनंती केली. अखेर डॉ. बिराजदार आणि डॉ. गायकवाड यांनी जखमी सर्पमित्र भोई यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. तत्काळ उपचार सुरू झाल्यानंतर सकाळी ४ वाजेच्या सुमारास विषचा प्रभाव कमी झाला आणि सर्पमित्र रविंद्र भोई यांचा जीव वाचला. पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या कठीण प्रसंगी संस्थेचे रवींद्र सोनवणे, राजेश सोनवणे, योगेश गालफाडे, राहुल सोनवणे, विकास भोई, जितेंद्र भोई, डॉ.खुशाल जावळे यांनी सहकार्य केले.

सर्पदंशाचे प्रमाण बघता त्यासाठी देखील स्पेशल उपाययोजना केल्या पाहिजे. कोरोना काळात सर्पदंश मृत्युदर वाढल्यास, याला जबाबदार कोण राहील? सर्प दंश झाल्यावर शासकीय उपचार केला पाहिजे. हे प्रशासनाने जाहीर करावे किंवा एखाद्या हॉस्पिटलला सर्पदंश रुग्णांसाठी अधिग्रहित करावे, याबाबत आम्ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेणार आहोत
– बाळकृष्ण देवरे, सदस्य, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव

 

विषारी सर्पदंश झाल्या नंतरचा पहिला तास खूप महत्वपूर्ण असतो. त्याला आम्ही गोल्डन अवर्स म्हणतो. त्या दरम्यान योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नगण्य असते. नेमका उपचार कुठे होईल ? हेच शोधण्यात वेळ जात असेल तर रुग्ण वाचणार कसे, असा प्रश्न उपस्थित होतो.
– रवींद्र फालक, सर्पमित्र अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव

Protected Content