Home Cities यावल एल निनोच्या पार्श्वभूमीवर लसूणबर्डी येथे ‘खेत बचाओ अभियान’; शेतकऱ्यांना शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे...

एल निनोच्या पार्श्वभूमीवर लसूणबर्डी येथे ‘खेत बचाओ अभियान’; शेतकऱ्यांना शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

0
48

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या सावखेडेसिम शिवारातील मौजे लसूणबर्डी आदिवासी पाड्यावर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘खेत बचाओ अभियान’ आणि ‘एल निनो’ विषयावर क्षेत्रीय किसान गोष्टी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 19 जून 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमात खरीप हंगामातील संभाव्य अडचणी, पावसातील अनिश्चितता आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

आगामी खरीप हंगामात हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, आत्मा (ATMA) यावल आणि कृषी विज्ञान केंद्र, पाल यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष किसान गोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्या नियोजनानुसार हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमात ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा, पावसात दीर्घ खंड पडण्याची शक्यता आणि त्यानुसार शेती पद्धतीमध्ये करावयाचे बदल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी हवामान आधारित शेती नियोजन करून कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, पाल येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. महेश महाजन यांनी खतांचा संतुलित वापर, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, फळबाग लागवड तसेच हवामान बदलाच्या काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर टाळून जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार (Soil Health Card) खतांचा वापर करण्याचे आवाहन केले. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

एल निनोच्या परिस्थितीत शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्यावरही भर देण्यात आला. एकाच पिकावर अवलंबून न राहता दोन किंवा अधिक पिकांची लागवड केल्यास मुख्य पीक अडचणीत आले तरी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळू शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. यावेळी बीबीएफ (Broad Bed Furrow) तंत्रज्ञानाबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत ओलावा टिकून राहतो तसेच अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते, असे सांगण्यात आले.

जैविक निविष्ठांचा वापर, घरच्या घरी कमी खर्चात कीड नियंत्रणाच्या उपाययोजना, जमिनीची सुपीकता वाढविण्याचे तंत्र आणि समूह गट शेती (पडजी पद्धतीने) करण्याचे फायदे याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपकृषी अधिकारी किरण वायसे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 तसेच महा डीबीटी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक व शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास उपकृषी अधिकारी किरण वायसे, सहाय्यक कृषी अधिकारी योगेश शिंदे, विनोद शिंदे, कैलास बारेला, शबाना तडवी, पोकरा समूह सहाय्यक प्रमोद साळुंके, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक रविंद्रसिंग जाधव, पुरस्कारप्राप्त शेतकरी कलिंदर तडवी व बिरम बारेला यांच्यासह प्रेमसिंग बारेला, चिमा बारेला, अनु बारेला, महिला शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी कैलास बारेला यांनी केले. परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी हवामान बदलाला पूरक असलेल्या शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.


Protected Content

Play sound