Home Cities जळगाव गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

0
38

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निरोगी जीवनशैली, मानसिक शांतता आणि उत्तम आरोग्याचा संदेश देत गोदावरी फाउंडेशन संचलित जळगाव येथील विविध वैद्यकीय व शैक्षणिक महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होत योग साधनेचा अनुभव घेतला.

यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “उत्कृष्ट आरोग्यासह वृद्धत्व आणि योग” या विषयावर आधारित होती. वाढत्या वयात शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

सारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज परिसर, जळगाव येथे सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक योग साधना शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक केले.

या योग दिन कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशन परिवारातील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल तसेच डॉ. केतकी पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. नियमित योगाभ्यासामुळे तणाव कमी होऊन शरीराची कार्यक्षमता वाढते तसेच निरोगी जीवन जगण्यास मदत होते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गोदावरी फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. संस्थेच्या प्रशासनाने विविध विभागांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला डॉक्टर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, समन्वयक, शिक्षक व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound