अरूण पाटलांना शिक्षा तर संजय सावकारेंना सुरक्षा ! : रावेरच्या निकालाचा राजकीय राडा

सावदा, ता. रावेर, प्रतिनिधी | रावेर विकासो मतदारसंघातून माजी आमदार अरूण पाटील यांच्या पराभवामुळे राजकीय व सहकारच नव्हे तर सामाजिक वातावरणही ढवळून निघाले आहे. भाजपशी जवळीकीची अरूण पाटलांना शिक्षा झाली असेल तर खुद्द भाजपचेच आमदार संजय सावकारे यांना सुरक्षा कशी प्रदान करण्यात आली ? असा प्रश्‍न चव्हाट्यावर आला आहे. या अनुषंगाने पत्रकार पंकज पाटील यांनी सोशल मीडियातील पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. अरूण पाटील यांच्या पराभवाची स्क्रीप्ट, याची फिल्डींग आणि संभाव्य परिणाम तसेच रावेरातील मराठा, लेवा आणि गुजर समाजातील समीकरणांवर याचा काय फरक पडणार याबाबत त्यांनी केलेला उहापोह खास आपल्यासाठी सादर करत आहोत.

माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अरूण पांडुरंग पाटील यांच्या जिल्हा बँकेतील पराभवामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या संदर्भात पंकज पाटील यांनी म्हटले आहे की-

जळगाव जिल्हा मध्य.सहकारी बँक २०२१ ची निवडणूक विविध पैलुंनी वैशिष्टपुर्ण ठरली आहे.या निवडणूकीत भाजप सुरवातीपासुन पुर्णपणे बँकफुटवर दिसली आहे. तर, महाविकास आघाडी ने प्रतिस्पर्ध्यास गाफिल ठेवत २१ पैकी २० जागांवर बाजी मारली आहे. भुसावळ सोसायटी मतदार संघातुन एका जागेवर मात्र, भाजप आमदार संजय सावकारे हे विजयी झाले आहे.रावेरात माजी आमदार अरुण पाटील यांना देखील बेसावध ठेवुन महाविकास आघाडीने धक्कादायक विजय संपादित केला आहे.

जिल्ह्यातील आघाडीच्या वृत्तपत्रांनी, सर्वप्रकारच्या प्रसिध्द माध्यमातून व चौकस नजरेतुन, माहीती घेतली असता भाजपशी सलगी व महाविकास आघाडीशी दुरावा हीच अरूणदादा पाटील यांच्या पराभवाची प्रमुख कारणे समोर आली आहेत. भाजप पक्षातील आपल्या जुन्या सहकार्‍याची सोबत अरूणदादा यांना नडली असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या एका गटाकडून दिले जात आहे. सुरवातीचा महाविकास आघाडीचा डाव उलथवण्यातय अरूण पाटील यांना यश मिळाले खरे. परंतु, हे यश कॉंग्रेस आमदार शिरीष चौधरी व राष्ट्रवादी चे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना रुचले नाही म्हणुनच मतदारांनी मतपत्रीकेवर मोहर उमटवण्याच्या काही घटका अगोदर अरूण पाटील यांच्या पराभवाचा डाव रचला गेला अशी चर्चा आहे.

कॉंग्रेसच्या दोघा उमेदवारांनी जाहीर पाठींबा देऊनही, केवळ भाजपचा पाठींबा म्हणुन रावेरच्या माजी आमदारांचा अभिमन्यु केला गेला. तर,अजुनही भाजपवासी असणार्‍या,विविध आंदोलनात महाविकास आघाडी विरोधात दिसणार्‍या भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा विजय कसा झाला? महाविकास आघाडीजवळ तुल्यबळ उमेदवार नव्हता का? की महाविकास आघाडिच्या पाठींब्यावर त्यांनी विजयश्री खेचला ? असे विविध प्रश्न रावेर तालुक्याच्या जनतेला या निमित्ताने पडली आहेत.

एकीकडे फक्त उमेदवारी कापली म्हणुन महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपचा पाठींबा घेणार्‍या अरुण पाटील यांना पराभवाची शिक्षा दिली.तर भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार्‍या आमदार सावकारे यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली. मग, अरूणदादांवरच अन्याय का? रावेर ची एखादी जागा अपक्ष आली तर काय बिघडलं असत ? अशी भावना पाटील यांच्या समर्थकांची आहे.

जिल्ह्यात पुढील काळात बाजार समिती,नगर पालिका ,जिल्हा परीषद,पंचायत समिती,या महत्त्वाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.रावेर तालुक्यात या सगळ्या निवडणूकीवर मात्र या सगळ्यांचा दुरगामी व्यापक परीणाम होणार हे मात्र नक्की. या शह-कटशह ,घात-प्रतिघात च्या निवडणूकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काय भविष्य असेल याची चुणूक या निकालातून दिसून आली आहे.

रावेर तालुक्यातील राजकारणात मराठा,लेवा,गुजर या तिन्ही जाती महत्त्वपूर्ण मानल्या जातात. जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान रावेर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतील मराठा समाजामध्ये दोन गट पडले आहेत. त्यातील एका गटासोबत लेवा पाटील तर दुसर्‍या गटासोबत गुजर पाटील हे प्रकर्षाने दिसून आले आहेत. यामुळे रावेर तालुक्यात येणार्‍या निवडणुकीत कोण कुणाचा कशाप्रकारे गेम कशा प्रकारे करेल हे सांगता येणार नाही. कौन किसके साथ ये अंदरकी बात असे राजकारण तालुक्यात दिसेल हे नक्की.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने रावेर तालुक्यात व मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व स्विकारले आहे. परंतु,जिल्हा बँकेच्या केलेल्या धक्कादायक खेळीमुळे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात असलेला निम्मे मराठा समाज दुखावला गेला आहे. या धक्कादायक तंत्राचे पडसाद २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवर पडतील अशी शक्यता आहे. या सर्व घडामोडींचा फायदा भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेचे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील हे कशा प्रकारे करून घेतात ? हे देखील बघावे लागणार आहे. तर रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातही याचे साईड इफेक्ट उमटणार का ? याची आता उत्सुकता लागली आहे.

जिल्हा बँकेच्या झालेल्या आश्चर्यकारक निवडणुकीमुळे संपूर्ण रावेर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अर्थात, राजकारणात कुणी कुणाचा चिरकाल शत्रू वा मित्र नसतो हे पण, शतप्रतिशत खरे आहे. रावेरातील निकालाने हेच पुन्हा एकदा अतिशय भेदक रितीने दाखवून दिले आहे. रावेरच्या निवडणउकीतील हा राडा आगामी काळातील राजकीय, सामाजिक आणि सहकाराच्या क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा असेल असे स्पष्टपणे दिसून येत आहे.

पंकज पाटील

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते
संपादक साप्ताहिक बनाना परिसर

मोबाईल क्रमांक : ९९२३७९१४७४

Protected Content