भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या चार महिन्यांपासून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या तिढ्याला अखेर पूर्णविराम मिळाला असून विद्यमान उपनगराध्यक्षा सौ. शैलेजा नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला आहे. सायंकाळी पाच वाजता पार पडलेल्या या पदग्रहण सोहळ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांना पदावरून दूर व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी रजा घेत न्यायालयात धाव घेतली होती. या संपूर्ण घडामोडींमुळे नगरपालिकेच्या कारभाराचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातील विविध विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय रखडत असल्याने नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, भुसावळ पालिकेचा कारभार कोणाकडे सोपवायचा याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू होती. भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे उपनगराध्यक्षांना नैसर्गिकरित्या प्रभारी नगराध्यक्षपदाचा कार्यभार देण्याची मागणी लावून धरली होती. जवळपास महिनाभर या विषयावर विविध स्तरांवर हालचाली सुरू असताना अखेर प्रशासनाने उपनगराध्यक्षा सौ. शैलेजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षा पदाची जबाबदारी सोपवली.
पदभार स्वीकारल्यानंतर सौ. शैलेजा नारखेडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. रखडलेली विकासकामे, मूलभूत सुविधा आणि शहरातील विविध प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया देताना शहराचा चौफेर विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. विकासकामांमध्ये कुठलेही राजकारण केले जाणार नाही, असे नमूद करत विरोधकांनी कायद्याचा अभ्यास करावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रभारी नगराध्यक्षा पदभार स्वीकारल्यानंतर सौ. नारखेडे यांनी तातडीने पालिकेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत विविध प्रलंबित कामांचा आढावा घेतला. रखडलेल्या कामांना त्वरित गती देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून शहर विकासाला चालना देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, भुसावळ नगर परिषदेतील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर प्रशासनाला नवे नेतृत्व मिळाल्याने शहरातील विकासकामांना आता वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रभारी नगराध्यक्षा म्हणून सौ. शैलेजा नारखेडे यांच्यासमोर शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.



