अरे देवा….कोरोनाने एकाच घरातील तिघांचा मृत्यू; सोबत मातेनेही घेतला निरोप !

Savda सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । कोरोनाचा संसर्ग आता अतिशय भयंकर भयावह पातळीवर पोहचला असून याचेच एक उदाहरण येथे आज घडले आहे. कोरोनामुळे एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला असून यासोबत त्यांच्या मातेनेही जगाचा निरोप घेतल्याने परिसराला धक्का बसला आहे. यामुळे चार दिवसात सावद्यातील परदेशी कुटुंबावर अक्षरश: आभाळ कोसळले आहे.

सावदा Savda परिसरात कोरोनाचा संसर्ग हा जिल्ह्याच्या अन्य भागांच्या तुलनेत थोडा उशीरा झाला. यानंतर मात्र येथे रूग्णसंख्या झपाट्याने वाढली. तर अनेक रूग्णांचा मृत्यू देखील झाला. मध्यंतरी येथील रूग्णसंख्या खूप कमी झाली होती. मात्र अलीकडे पेशंटची संख्या वाढीस लागली आहे. तर आता कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील वाढू लागली आहे. यातच आता येथील परदेशी कुटुंबातील तिघे जण कोरोनामुळे तर महिला उपचार सुरू असतांना मृत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सावदा Savda येथील परदेशी कुटुंब हे कर्तबगार आणि प्रतिष्ठीत असे मानले जाते. या कुटुंबातील पत्रकार म्हणून कार्यरत असणारे कैलाससिंह परदेशी (वय५५) यांचे आज कोरोनाचा उपचार सुरू असतांना निधन झाले. तर, त्यांचे बंधू तथा एलआयसी एजंट किशोर गणपतसिंह परदेशी (वय ५२) आणि त्यांची पत्नी संगीता किशोर सिंह परदेशी (वय ४८) यांचे देखील कोविडच्या संसर्गावरील उपचार सुरू असतांना निधन झाले. तर कैलाससिंह आणि किशोर परदेशी यांच्या मातोश्री कुवरबाई गणपतसिंह परदेशी यांचा अन्य व्याधीवर उपचार सुरू असतांना निधन झाले. गेल्या चार दिवसात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसर अक्षरश: स्तब्ध झाला आहे. यातील प्रौढवयीन तिघांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याने परदेशी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. परिसरातून यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कैलाससिंह परदेशी यांचा जनसंपर्क दांडगा असून दैनिक सामनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कार्यकुशलतेची छाप सोडली होती. तर त्यांचे बंधू किशोर हे देखील एलआयसीमध्ये असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. यामुळे परदेशी बंधूंच्या जाण्याने सावद्यासह परिसरातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content