
मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्ह्यात हिवताप नियंत्रण व जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवून नागरिकांना डासजन्य आजारांविषयी सजग करण्याचा संदेश देण्यात आला. डासांची उत्पत्ती रोखणे, तापाकडे दुर्लक्ष न करणे आणि वेळेवर उपचार घेणे यावर भर देत आरोग्य विभागाने नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

दरवर्षी २५ एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय, जळगाव यांच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिवताप हा डासांमार्फत पसरणारा गंभीर आणि जीवघेणा आजार असून, विशेषतः प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स आणि प्लाझमोडियम फॅल्सीपेरम या परजीवींमुळे तो उद्भवतो. अॅनॉफिलीस जातीच्या मादी डासांमुळे हा संसर्ग पसरत असल्याने डास नियंत्रणावर भर देणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
स्वच्छ पाण्याच्या साठ्यात डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. साचलेले पाणी, उघड्या टाक्या, कुलर, वापरात नसलेली भांडी किंवा टाकाऊ साहित्य यामध्ये डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एकदा परिसराची पाहणी करून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
हिवतापाची लक्षणे म्हणून थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि अशक्तपणा यांचा समावेश होत असून, वेळेवर निदान व उपचार न घेतल्यास हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. विशेषतः गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी हिवताप अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष न करता तातडीने रक्त तपासणी करून उपचार सुरू करणे गरजेचे असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी नियमित सर्वेक्षण, रक्त नमुन्यांची तपासणी, किटकनाशक फवारणी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबवत आहेत. अळीनाशक फवारणी, गप्पी मासे सोडणे, तसेच किटकनाशकयुक्त मच्छरदाण्यांचा वापर यावर विशेष भर दिला जात आहे. डास नियंत्रणासाठी केवळ प्रशासन नव्हे तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद वाय. सोनवणे यांनी नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच हिवताप नियंत्रण शक्य असल्याचे सांगत, स्वच्छता आणि जनजागृती हीच प्रभावी प्रतिबंधात्मक शस्त्रे असल्याचे नमूद केले. “कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका, तो हिवताप असू शकतो,” असा इशारा देत त्यांनी पूर्ण उपचार घेण्याचे आवाहन केले.



