Home Cities जळगाव बालचित्रपट महोत्सवातून मुलांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड वाढणार – महापौर दीपमाला...

बालचित्रपट महोत्सवातून मुलांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड वाढणार – महापौर दीपमाला काळे


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डिजिटल युगात मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना मानवी मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जळगावात आयोजित ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाने वेगळा ठसा उमटवला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून बालकांमध्ये सामाजिक भान निर्माण होईल तसेच कलेबद्दलची आवड वाढीस लागेल, असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला.

अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भाऊंचे उद्यान येथे २४, २५ आणि २६ एप्रिलदरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता हा उपक्रम पार पडत असून, मुलांसह पालकांनाही आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळत आहे.

उद्घाटन सोहळ्यावेळी बोलताना महापौर काळे यांनी आजच्या काळात मुलांना चांगल्या आशयाचे चित्रपट दाखवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये केवळ मनोरंजनच नाही, तर सामाजिक जाणीवा आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होते. भविष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना महानगरपालिका पूर्ण सहकार्य देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले. महापौर दीपमाला काळे यांचे स्वागत जयेंद्र लेकुरवाळे आणि विनोद ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन अनघा गोडबोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन वर्षा उपाध्ये यांनी केले. यावेळी अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे, पालकशाळेचे रत्नाकर पाटील, डॉ. विद्या पाटील, शैलेश शिरसाठ तसेच बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी ४थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपट विजेती ‘शाळा सुटली’ तसेच ‘बेबीज डे आउट’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपटांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि चित्रपटांमधून मिळणारा संदेश यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली.

शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे. मुलांनी अशा दर्जेदार चित्रपटांचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound