Home राज्य महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीस उद्या मतदान

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीस उद्या मतदान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणुकीसाठी रविवारी 26 एप्रिल रोजी राज्यभर मतदान होणार असून सुमारे 1.23 लाख वैद्यकीय व्यावसायिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परिषदेच्या 9 जागांसाठी तब्बल 60 उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना, गट आणि त्यांना मिळणारे राजकीय पाठबळ यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.

महाराष्ट्रातील वैद्यकीय व्यवसायाची सर्वोच्च मानली जाणारी ही परिषद डॉक्टरांच्या नोंदणी, शिस्त, नैतिकता आणि व्यावसायिक आचारसंहितेसंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी संस्था असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 9 जागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी विविध वैद्यकीय संघटनांनी मोर्चेबांधणी केली असून काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या बैठका आणि रणनीतीही आखल्या जात असल्याचे चित्र आहे.

रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या मतदारांना मतदानासाठी ओळख पटविण्यासाठी मूळ दस्तऐवज सोबत बाळगणे आवश्यक करण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, परिषदेचे ओळखपत्र, निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र यांचा समावेश आहे. विवाहित महिला मतदारांनी नाव बदलले असल्यास त्याचा पुरावाही सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदाराला नऊ मते देण्याचा अधिकार असणार आहे. मतपत्रिकेवर पसंतीच्या उमेदवारांसमोर गुणाकाराचे चिन्ह करून मतदान करावे लागणार असून यासाठी काळी बॉलपेन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील जिल्हानिहाय मतदारसंख्येकडे पाहता मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टर मतदार आहेत. मुंबईत 16 हजार 668, पुण्यात 14 हजार 295, ठाण्यात 11 हजार 851, नागपूरमध्ये 8 हजार 455, तर जळगाव जिल्ह्यात 2 हजार 570 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यांतील मतदानाचा निकालावर निर्णायक प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मतदानानंतर 29 एप्रिल रोजी मुंबईतील परळ येथील हाफकीन प्रशिक्षण संस्थेत सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार असून त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे. या निकालातून पुढील काळात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट होणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय, व्यावसायिक हितसंबंध आणि वैद्यकीय क्षेत्रातील शिस्त यासाठी महत्त्वाची असलेल्या या निवडणुकीकडे डॉक्टर समुदायात मोठी उत्सुकता असून उद्याचे मतदान राज्यातील वैद्यकीय राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार आहे.


Protected Content

Play sound