जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अकोला जिल्ह्यातील ५७ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल साडेनऊ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढून तिला नवजीवन देण्याची उल्लेखनीय कामगिरी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र पोटदुखी, पोटाचा वाढलेला आकार आणि दैनंदिन हालचालींमध्ये होणारा त्रास सहन करणाऱ्या या महिलेवर करण्यात आलेली ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन दिवसांत तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भिली येथील ५७ वर्षीय महिलेला मागील तीन महिन्यांपासून सतत पोटदुखी, पोट फुगणे आणि चालणे-फिरणे यासह दैनंदिन कामांमध्ये अडचणी जाणवत होत्या. सुरुवातीला सामान्य आजार समजून विविध ठिकाणी उपचार घेतल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर अधिक तपासणीसाठी तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी रुग्णाची सखोल तपासणी केली. त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये गर्भपिशवीच्या डाव्या बाजूच्या अंडाशयावर (लेफ्ट ओव्हरी) मोठ्या आकाराचा ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले. गाठीचा आकार अत्यंत मोठा असल्याने आतड्यांवर मोठा दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे रुग्णाला असह्य वेदना होत होत्या.

रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. चैतन्य पाटील यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ पथकाने अत्यंत काळजीपूर्वक ओपन ट्युमर एक्सिशन ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटातून तब्बल साडेनऊ किलो वजनाची गाठ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. गाठीचा प्रचंड आकार आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या जवळील स्थानामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र अनुभवी डॉक्टरांचे कौशल्य, योग्य नियोजन आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे कोणतीही गुंतागुंत न होता शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. शस्त्रक्रियेनंतर महिलेवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) बारकाईने उपचार करण्यात आले. डॉ. आदित्य पाटील, डॉ. अनुष्का साने, डॉ. प्रणव शेवाळे, भूलतज्ज्ञ डॉ. शितल, डॉ. सोनाली तसेच परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली. अवघ्या तीन दिवसांत तिच्या पोटातील वेदना पूर्णपणे कमी झाल्या असून ती आता व्यवस्थित चालणे-फिरणे, दैनंदिन हालचाली करणे आणि आहार घेणे सुरू केले आहे.
याबाबत शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी सांगितले की, “अंडाशयावरील गाठी सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता हळूहळू वाढू शकतात. त्यामुळे सतत पोट फुगणे, पोटदुखी, भूक कमी लागणे किंवा वजनात अनपेक्षित बदल जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी आणि योग्य निदान झाल्यास अशा आजारांवर प्रभावी उपचार शक्य होतात. या रुग्णामध्ये गाठ मोठ्या आकाराची असली तरी अनुभवी शल्यचिकित्सकांचे कौशल्य, योग्य नियोजन आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.”



