Home Cities जळगाव ‘आरोग्यसेवेत तडजोड अजिबात नको!’ करिश्मा नायरांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

‘आरोग्यसेवेत तडजोड अजिबात नको!’ करिश्मा नायरांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

0
31


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दर्जेदार सुविधा, स्वच्छता आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी समितीची सभा मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी शाहू महाराज सभागृहात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, डॉ. दीपक जाधव, डॉ. विशाल पाटील, डॉ. धापते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत करिश्मा नायर यांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार (NQAS) जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. प्रत्येक केंद्रात निर्धारित निकषांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात, तसेच नागरिकांना वेळेवर आणि विश्वासार्ह उपचार मिळावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमधील बालकांच्या आरोग्य तपासण्या अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. बालकांमधील आरोग्य समस्या वेळेत ओळखून उपचार मिळावेत, यासाठी तपासणी मोहिमा काटेकोरपणे राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्रे ही ग्रामीण नागरिकांसाठी आरोग्यसेवेची महत्त्वाची आधारस्थाने आहेत. त्यामुळे त्यांची स्वच्छता, शिस्त आणि सेवा गुणवत्ता टिकविणे हे आरोग्य विभागाचे प्रथम कर्तव्य असल्याचे नायर यांनी नमूद केले.

ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीतील निर्देशांमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गुणवत्ता सुधारण्यास अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound