भुसावळ संतोष शेलोडे । सभ्य व सुसंस्कृतपणा हा राजकारणातही स्ट्राँग पॉईंट ठरू शकतो यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडणार्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे भुसावळचे आमदार संजय सावकारे होत. राजकारणातील झोटींगशाहीमुळे भुसावळकर त्रासलेले असतांनाच सावकारेंचा राजकीय क्षेत्रात उदय होऊन ते तेजाने तळपू लागले आहेत. आता त्यांना आव्हान देण्यासाठी त्यांचे सध्याचे कट्टर विरोधक माजी आमदार संतोष चौधरी यांनी संजय सावकारे यांच्याच सजातीय उमेदवाराला पुढे करून आपला हुकमी पत्ता फेकला आहे. अर्थात, ‘लोहे को लोहा काटेंगा’ अशी यामागची भूमिका असली तरी ते शक्य आहे का ? याचाच उहापोह करणारे हे भाष्य.
आकस्मिक निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी सतीश घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, ही बातमी येताच कोण हे सतीश घुले ? असा सर्वांना प्रश्न पडू शकतो. मात्र त्यांची प्रतिमा पाहिल्यानंतर अर्ध्या भुसावळकरांना तरी हा चेहरा परिचीत वाटेल. कारण शहरात सर्वाधीक गजबजलेल्या छत्रपती शिवाजी संकुलातील सर्वात पॉप्युलर स्पॉट असणार्या ‘मनीष ट्रॅव्हल्स’चे ते संचालक आहेत. तथापि, राष्ट्रवादीचे आजवर सदस्यदेखील नसणार्या व्यक्तीला थेट तालुकाध्यक्षपद मिळाल्याचे नेमके कारण तरी काय ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर सतीश घुले हे राष्ट्रवादीकडून आमदारकी लढविणार असल्याची शक्यता असून त्यांनी स्वत: याला दुजोरा दिला आहे. वास्तविक पाहता, भुसावळातून भीमसैनिकच आमदार होणार असल्याची जाहीर घोषणा संतोष चौधरी यांनी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात केली होती. यानुसार त्यांच्या जनआधार आघाडीचे गटनेते उल्हास पगारे यांच्यासह अन्य समर्थकांची नावेदेखील चर्चेत आली होती. मात्र आपल्या घोषणेवरून घुमजाव करत चौधरी यांनी सतीश घुले यांना आकस्मिकपणे समोर केल्याने राजकीय वर्तुळ चक्रावून गेले आहे.
सोशल इंजिनिअरींग
संजय सावकारे यांनी २००९ आणि २०१४ मध्ये राजेश झालटे यांना पराभूत केले. पहिल्यांदा झालटे यांनी त्यांची दमछाक केली होती. तेव्हा शिवसेनेत असणार्या काही पदाधिकार्यांच्या चुकीमुळे झालटेंचा अल्प मतांनी पराभव झाला. तर पुढील निवडणुकीत ते राष्ट्रवादीकडून लढले. तेव्हा शिवसेनेकडून संजय ब्राह्मणे रिंगणात होते. मात्र या तिरंगी लढतीत सावकारेंनी पुन्हा बाजी मारली. खरं तर, भुसावळात दलीत व अल्पसंख्यांक समुदाय एकत्र आल्यास विजयी समीकरण आकारास येऊ शकते. मात्र दलीत वर्चस्वाची भिती दाखवून पहिल्यांदा संतोष चौधरी तर दुसर्यांदा त्यांच्या विरोधकांनी संजय सावकारे यांना निवडून आणले. यामुळे आता सावकारे यांच्याच चर्मकार समाजातील सतीश घुले यांना समोर करण्यात आले आहे. त्यांच्यामुळे समाजातील मतांचे विभाजन होऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे या मतदारसंघात निर्णायक स्थितीत असणार्या लेवा पाटीदार समाजासोबत घुले यांचा सलोखा महत्वाचा ठरणार आहे. याशिवाय, अन्य समाजांची स्वीकार्यता आणि राष्ट्रवादीचा पारंपरीक मतदार यांची जोडणी करून संजय सावकारे यांना आव्हान देण्याचे गणित यातून मांडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अगदी समान स्थिती
आमदार संजय सावकारे हे राजकारणातील ‘मुकद्दर का सिकंदर’ मानले जातात. त्यांना सातत्याने नशिबाने साथ दिली आहे. संतोष चौधरी यांची साथ सोडून देण्याचा त्यांचा निर्णय हा त्यांना लाभदायक ठरला. अगदी मंत्रीपद असतांनाही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्याचे चातुर्य त्यांनी दाखविले तेव्हा नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हादेखील लोक नगरपालिकेच्या नावाने ओरडत असतांना याच लोकांनी सावकारे यांना प्रचंड मताधिक्याने विधानसभेत पाठविले. आतादेखील नगरपालिकेच्या नावाने भुसावळकर खडे फोडत असले तरी आमदार संजय सावकारे निर्धास्त दिसत आहेत. एक तर ग्रामीण भागातला अपेक्षित पाठींबा आणि मतदारसंघात सक्षम पर्याय नसल्याच्या बाबी यासाठी कारणीभूत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भक्कम साथ त्यांच्या पाठीशी आहे. या सर्व बाबींचा विचार करून सक्षम उमेदवाराचा शोध घेतांना संतोष चौधरी यांनी सावकारेंचा सजातीय आणि कोरी पाटी असणारा उमेदवार समोर करून राजकीय मुरब्बीपणा दाखविला आहे. या सर्व गदारोळात सावकारेंचे गेल्या वेळचे दोन्ही प्रतिस्पर्धी म्हणजेच संजय ब्राह्मणे आणि अॅड. राजेश झालटे यांनी अद्यापदेखील आपले पत्ते खुले केली नसल्याची बाब लक्षात घेण्याची गरज आहे.
बरेच अंतर्गत प्रवाह
गत वेळी शिवसेनेकडून लढलेल्या संजय ब्राह्मणे यांनी मध्यंतरी काँग्रेसतर्फे उमेदवारीची तयारी करत शहरात गाठीभेटी सुरू केल्या होत्या. यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे जाणार असल्याची चर्चा सुरू होती. यातच आता राष्ट्रवादीतर्फे चेहरा समोर आल्याने आता ब्राह्मणे हे वरिष्ठ पातळीवरून वेगळे सूत्र हलविणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. अॅड. राजेश झालटे हे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांसोबत वावरत असले तरी ते स्वत: उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट आहे. या आघाडीकडून नगरसेवक रवी सपकाळे तयारीला लागले आहेत. यातच वंचित व एमआयएम स्वतंत्र लढल्यास अजून नवीन उमेदवार येऊ शकतात. तर युती तुटण्यावरही बर्याच उमेदवारांची नजर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे खुद्द भाजपकडून डॉ. राजेश मानवतकर यांनी उमेदवारीच्या अपेक्षने तयारी सुरू केल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी संघाच्या कनेक्शनमुळे तिकिट मिळवणार असल्याचा दावा केला आहे. एकंदरीत पाहता लढत ही बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट असून कुणाच्या मतपेढीचे विभाजन होणार यावरच विजेता ठरणार आहे. तर भुसावळ नगरपालिकेतील अंतर्गत कलहाचा फटका सावकारेंना बसू शकतो अशीदेखील चर्चा आहे. यातच सावकारे आणि घुले हे सजातीय उमेदवार समोर ठाकल्यास ही लढत चांगलीच चुरशीची होऊ शकते. यामुळे सावकारे यांचे प्रथम राजकीय गुरू संतोष चौधरी यांनी हुकमी चाल खेळली असली तरी याला यश लाभेल का ? हे सांगता येणार नाही. ‘लोहे को लोहा काटेंगा की नही ?’ याचे उत्तरदेखील काळच देणार आहे. अर्थात, यामुळे भुसावळातील सामना रंगतदार होणार हेदेखील तितकेच खरे !