देशाच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले ? : संजय राऊतांचा सवाल

मुंबई । कोरोना देवाची करणी असे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यामुळे सरकारची जबाबदारी संपली हे पाहिले व देवदूत डॉक्टरांचाही निकाल लावला. हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणार्‍या देशाला शोभणारे नाही. देशाच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले ?अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर आज जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनामधील आपल्या रोखठोक या स्तंभातून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, नोटाबंदी ते लॉक डाऊन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था साफ मरून पडली आहे. पण या पानिपताचे खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरळ देवावर फोडले. कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. स्वतःच्या अपयशाचे खापर देवावर फोडणे हाच हिंदुत्वाचा अपमान आहे. कोरोना देवाची करणी असे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यामुळे सरकारची जबाबदारी संपली हे पाहिले व देवदूत डॉक्टरांचाही निकाल लावला. आता देवच कोरोनाग्रस्तांना बरे करेल. मग ती लस तरी का शोधायची? हा प्रश्‍नसुद्धा आहेच. हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणार्‍या देशाला शोभणारे नाही. देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले? असा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, प्रजेला तिच्या लायकीप्रमाणे राजा मिळतो हेसुद्धा सत्यच आहे. कोरोना म्हणजे अ‍ॅॅक्ट ऑफ गॉड म्हणजे देवाची करणी असे सरकारी पातळीवर जाहीर होताच प्रजा तरी कशी मागे राहील? बिहारमधल्या एका गावातील महिलांनी वेशीबाहेर कोरोना देवीचे मंदिर उभे केले. त्याच वेळी महाराष्ट्रातील बार्शी येथे कोरोना रोखण्यासाठी कोरोना देवीचीच स्थापना करण्यात आली. कोरोना देवीची स्थापना करणार्‍या ताराबाई पवारांवर बार्शीच्या तहसीलदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल केला. हा बडगा जनतेवर उगारला. पण कोरोना म्हणजे देवाचा प्रकोप असे जाहीरपणे सांगणार्‍या निर्मला सीतारामन यांच्यावरही त्याच कायद्याने गुन्हा दाखल का झाला नाही?

आधी कोरोना व नंतर आर्थिक घसरण हे संकट आहेच. पण कोरोना येण्याआधीच देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्याचे खापर कोणावर फोडणार? रोग हा दैवी प्रकोपात मोडतो हे एकविसाव्या शतकात कोणी बोलत असेल तर आपण अजून जंगल युगात वावरत आहोत. हजारो वर्षांपूर्वी ऑरिस्टॉटलने म्हटले होते की, ङ्गजोडे वापरणार्‍यालाच ते कुठे बोचतात ते कळते. जोडे वापरणारी जनता, दुःख भोगणारा सर्वसामान्य माणूस. मग ही दुःखे राज्यकर्त्या नोकरशाहीला, मग ती पक्षाची असो वा सरकारची, कळणारच कशी? आजही काही स्थिती वेगळी नाही.

पण हा सर्व दैवी प्रकोप आहे. त्यामुळे सरकारवर ठपका ठेवून काय उपयोग? पण देवांना दोष द्यायचा तर देवसुद्धा बंदिवान आहेत. मुख्य म्हणजे माणसांच्या संरक्षणात ते आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर देवांनी करणी केली असे का बोलता? विजय मल्ल्या, नीरव मोदी, हर्षद मेहता, बँकांची कर्जे बुडवणार्‍या भांडवलदारांनी देश बुडवला. जे गेल्या ७० वर्षांत झाले ते मागच्या सहा वर्षांतही बदलले नाही. देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई? असा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे.

Protected Content