मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत हे शिवसेनेचे नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते असून त्यांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे ! असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी केला आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारापासून सर्व शिवसैनिकांना दूर नेण्याचा मोठा वाटा संजय राऊतांचा आहे. मुळात राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण ते नेहमी राष्ट्रवादीचे गुणगान गात असतात. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली हे आम्हाला नेहमीच वाटतं. त्यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारापासून लांब नेलंय. त्यांनी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दावणीला बांधला असल्याची टिका देखील केसरकर यांनी केली.
दरम्यान, केसरकर म्हणाले की, संजय राऊत हे राज्यसभेत आमच्या मतावर निवडून गेले आहेत. त्यांना थोडी तरी नैतिकीची जाणीव असेल तर त्यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावं. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदारच मतदान करणार आहेत. त्यामुळे राऊत यांनी हा प्रयोग करून पाहावच असे खुले आव्हान देखील दीपक केसरकर यांनी याप्रसंगी दिले.